बारामती विधानसभेच्या निवडणुकीवर यंदा संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीनंतर आता विधानसभेला पुन्हा युगेंद्र पवार आणि अजित पवार हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार आठव्यांदा मैदानात आहेत. मात्र यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी अटीतटीची असणार आहे. शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला.






राज्यात येणारे वेदान्ता फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रकल्प गेले. नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान नाही, देशाचे पंतप्रधान आहेत, पण त्यांनी देशाचा विचार केला नाही, अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची का असं म्हणत शरद पवार यांनी निशाणा साधला. यावेळी आम्ही तरुण पिढीच्या हाती सत्ता द्यायचं ठरवलं. युगेंद्र पवार यांना संधी दिली. त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं, इथे येऊन कारखान्यात लक्ष घातलं, ऊस शेतीत लक्ष घातलं. विद्या प्रतिष्ठानच्या अर्थिक जबाबदारी युगेंद्रकडे दिलेली आहे. तुमचं नेतृत्व करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे असं म्हणत शरद पवार यांनी तुतारी समोरचं बटण दाबून युगेंद्र पवार यांना विजयी करण्याचं आवाहन केलं.
अजित पवार यांना आम्ही संधी दिली, त्यांना अनेकदा उपमुख्यमंत्री केलं, त्यांनी कामंही केलं, त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण आधी माझी पिढी, त्यानंतर अजित पवार यांची पिढी आणि आता युगेंद्रची पिढी आहे असं शरद पवार म्हणाले. बारामतीतलं समजकारण, अर्थकारण सुधारण्यासाठी कुणीतरी इथे असण्याची गरज आहे. युगेंद्र उच्चशिक्षित आहे, स्वच्छ प्रतिमेचा आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली. इथली जबाबदारी त्यांच्या हातात सोपवण्याचं आवाहनही शरद पवार यांनी केलं.
देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, बारामतीचं नाव घेतलं की ते कुणाचं नाव घेतात? लोकांमध्ये आवाज आला पवार…ही परंपरा पुढे चालू ठेवायची असेल तर यासाठी पुढची पिढी, कर्तबगार पिढीची बारामतीला अवश्यकता आहे असं शरद पवार म्हणालेत. त्यामुळे युगेंद्रला विजयी करा असं शरद पवार म्हणाले आहेत.











