काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. संगमनेरमधील धांदरफळमध्ये भाजपचे नेते, माजी खासदार सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर जयश्री यांचे आत्ये भाऊ सत्यजीत तांबे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुजय विखे यांच्या सगळ्यात जवळचे आणि तालुक्यातील सगळ्यात मुर्ख.., असा वसंतराव देशमुख यांचा उल्लेख सत्यजीत तांबे यांनी केला. नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असं सत्यजीत तांबे म्हणालेत.
सत्यजीत तांबे यांचं ट्विट
आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे.
ह्याच वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची.
बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच.
वसंतराव देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य
भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं विधान वसंतराव देशमुख यांनी केलं आहे.
वसंतराव देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. जयश्री थोरात यांनी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्रभर पोलीस स्टेशनबाहेर त्या बसून होत्या. अखेर पहाटे देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या. ज्यांनी गाड्या फोडल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे.