परतीच्या पावसाने केला घात

0
8

स्मानी संकटाने बळीराजाचे कंबरडेच मोडले असून रायगड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसाने शेकडो एकरावरील उभी पिके आडवी झाल्याने त्यांचा चिखलच झाला आहे.कापणीला आलेल्या भाताची अक्षरशः माती झाल्याने बळीराजा कोलमडून गेला आहे. पीक पाण्यावर तरंगत असल्याचे पाहून शेतकऱ्यांचे डोळे भरून येत आहेत. याविरोधात बळीराजाने संताप व्यक्त केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या मिंधे सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले खरे. परंतु अद्यापही सरकारी बाबू बांधावर न फिरकल्याने संताप व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने भात पिकाला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात ९७ हजार २७२ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे उभी पिके आडवी झाली आहे. दिवाळीपूर्वी खरीप पिकाची कापणी, मळणी करून धान्य घरात येते. मात्र या वर्षी परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे यंदाच्या दिवाळीला खरिपाचे धान्य घरात येणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

शेतात पिके तरंगली

कर्जत तालुक्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. यातील अवसरे, कोदीवले, माले, आर्डे, पाषणे, खांडस, चई, ओलमन, पाथरज, कडाव आदी भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने हे पीक शेतातच तरंगत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वादळी पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे.

पंचनामे करून भरपाई द्या !

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी महागडे बियाणे आणून भात शेती लावली. मात्र परतीच्या पावसाने भात पिके आडवी झाली. यामुळे घर चालवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कृषी धन सहकारी मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ सांबरे यांनी कल्याण तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा