हिंमतसुद्धा करू नका..; तिरुपती लड्डू वादाची खिल्ली उडवणाऱ्या अभिनेत्यावर भडकले पवन कल्याण

0

तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादावरून खूप मोठा वाद सुरू आहे. एकीकडे आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी अभिनेते प्रकाश राज यांना यावरून फटकारलंय. तर दुसरीकडे आता त्यांनी अभिनेता कार्तीवरही निशाणा साधला आहे. त्यानंतर कार्तीलाही जाहीर माफी मागावी लागली. हे संपूर्ण प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेता कार्ती हा 23 सप्टेंबर रोजी हैदराबादमधल्या एका कार्यक्रमात पोहोचला होता. या कार्यक्रमात त्याला काही मीम्स दाखवले होते. त्यापैकी एक मीम लाडूवरून होता. “तुला लाडू हवेत का”, असा प्रश्न त्याला विचारला गेला. त्यावर उत्तर देताना कार्ती असं काही म्हणाला, ज्यावरून पवन कल्याण भडकले.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

‘हा मुद्दा खूप संवेदनशील आहे आणि त्यावरून आता आपण नको बोलुयात’, असं कार्ती म्हणतो आणि जोरात हसू लागतो. त्याच्यासह उपस्थित सर्वजण हसू लागतात. कार्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पवन कल्याण यांनी त्यावरून सुनावलं. 24 सप्टेंबर रोजी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी फिल्म इंडस्ट्रीला सांगतो की जर तुम्ही याबद्दल बोलणार असाल तर आदरपूर्वक बोला. नाहीतर अजिबात बोलू नका. पण तुम्ही त्या विषयाची खिल्ली उडवली किंवा मीम्स बनवले तर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. हा विषय बऱ्याच लोकांसाठी अत्यंत वेदनादायी आहे आणि तुम्ही त्याच विषयाची गंमत करत आहात.” यानंतर कार्तीने सोशल मीडियाद्वारे पवन कल्याण यांची जाहीर माफी मागितली.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

‘पवन कल्याण सर, तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. माझ्या वागण्यावरून अनपेक्षित गैरसमज निर्माण झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मीसुद्धा भगवान व्यंकटेश्वर यांचा भक्त आहे. मला आपल्या परंपरा नेहमीच प्रिय आहेत’, असं कार्तीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. कार्तीच्या या जाहीर माफीचा पवन कल्याण यांनीसुद्धा मोठ्या मनाने स्वीकार केला.

‘तुझा विनम्र स्वभाव आणि जलद प्रतिसाद तसंच आपल्या परंपरेबद्दल तू दाखवलेल्या आदराची मी मनापासून प्रशंसा करतो. तिरुपती आणि तिथले प्रसादाचे लाडू हा विषय लाखो भक्तांसाठी अत्यंत भावनिक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी अशा विषयांची काळजीपूर्वक हाताळणी करणं गरजेचं आहे. तुझ्या वागण्यामागे कोणताही हेतू नव्हता हे माझ्या निदर्शनास आलं आणि मला समजलं की त्या परिस्थितीत तू अनावधानाने वागलास. आपली संस्कृती आणि अध्यात्मिक मूल्ये यांना आपण सर्वाधिक महत्त्व देतो, त्यामुळे अशा गोष्टींबद्दल आदर आणि एकता वाढवणं ही सेलिब्रिटी म्हणून आपली जबाबदारी असते. सिनेमाच्या माध्यमातून सतत प्रेरणा देत राहून ही मूल्ये जपण्याचा आपण प्रयत्न करुयात’, असं ट्विट पवन कल्याण यांनी केलंय.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य