राज्यामध्ये शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे या सर्वांच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी पुन्हा आली आहे ती म्हणजे विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार १२ जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणीही पार पडेल. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीच्या काळात मोठी जबाबदारी पार पडलेल्या खांद्यांवरती उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वजण कामाला लागले आहेत.






सर्वसाधारणपणे प्रादेशिक समतोल राखण्यासाठी ज्या भागातून विधान परिषद सदस्य रिक्त होतात त्या भागातीलच कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये प्राधान्य दिले जात असल्याचे परंपरा लक्षात घेऊन पुण्यातून रिक्त होणाऱ्या डॉ. प्रज्ञा सातव (स्वर्गीय शरद रणपिसे) यांच्या जागेवरती कुणाची वर्णी लागणार ही चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेसकडे असल्यामुळे या पुण्यातील जागेवरती कुणाची वर्णी लावली जाते ही चर्चा आहे. पुणे लोकसभेमध्ये रंगत आणण्याचे काम यावेळी शहरातील विविध कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करून केले असल्याने आगामी काळात शहरातील कार्यकारणीला ताकद देण्याच्या दृष्टीने पुणे शहराला या विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पुणे शहरातील पर्वती शिवाजीनगर व वडगाव शेरी या भागामध्ये पक्षाची ताकद वाढत असून या भागातील कार्यकर्त्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात यावे अशीही भूमिका पुणे शहर काँग्रेसच्या वतीने देण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुतीचा प्रयोग झाल्यापासून पुणे शहरांमध्ये महायुतीच्या वतीने ही विधानपरिषद आमदार नियुक्त होण्याची शक्यता आहे. बदलत्या समीकरणांनुसार अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडून या पदांवर दावा दाखवून अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा आमदारांनी निवडून दिलेल्या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपत असल्यानं ही निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडेही इच्छुकांची संख्या जास्त असून बदललेल्या समीकरणाच्या आधारे भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्यामार्फतही पुण्यात आमदारकीची माळ पडण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने मात्र डॉ. प्रज्ञा सातव यांना संधी दिल्यापासून त्यांचा या भागामध्ये सक्रिय सहभाग राहिला नाही परंतु विदर्भ पट्ट्यामध्ये त्यांना सत्तेत राहणे हे क्रमप्राप्त असल्याच्या कारणास्तव पुन्हा संधी देण्याची दाट शक्यता आहे.
हे सदस्य निवृत्त?
डॉ. मनिषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला खान दुरानी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील,रामराव पाटील, डॉ. वजहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत पाटील
निवडणुक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:-
नोटिफिकेशन – मंगळवार, २५ जून २०२४
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – मंगळवार, २ जुलै २०२४
उमेदवारी अर्जांची छाननी – बुधवार, ३ जुलै २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – शुक्रवार, ५ जुलै २०२४
निवडणूक दिनांक – शुक्रवार १२ जुलै २०२४
मतदानाची वेळ – सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी – शुक्रवार, १२ जुलै २०२४. संध्याकाळी ५ वाजता.
निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्याचा दिनांक – मंगळवार, १६ जुलै २०२४












