महायुतीचे नेते झिरवळ थेट मविआ व्यासपीठावर; ‘मेसेज’ देण्यासाठी ठरवून कार्यक्रम? राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू?

0

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात शुक्रवारी धक्कादायक प्रकार घडला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ठेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले.

निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा शुक्रवारी तिसगाव (दिंडोरी) येथे प्रचार दौरा होता. हा दौरा पूर्वनियोजित होता. यावेळी भगरे यांचा प्रचार दौरा सुरू होण्याआधीच गावातील मारुती मंदिरातील एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ सकाळीच येऊन थांबले होते. मंदिरातील कार्यक्रम झाल्यानंतर नागरिकांच्या आग्रहाखातर ते महाविकास आघाडीच्या भगरे यांच्या प्रचार सभेलाही उपस्थित राहिले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

झिरवळ थेट व्यासपीठावर जाऊन बसले. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेटे यांच्याशी चर्चा देखील केली. नंतर ते तेथून निघून गेले. झिरवळ महायुतीचे नेते असताना ते महाविकास आपाडीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर गेल्याने राजकीय कार्यकर्त्यांत तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला. हा महायुतीला राजकीय धक्का मानला जात आहे. झिरवळ यांनी हा ‘मेसेज’ देण्यासाठी ठरवून केलेला कार्यक्रम होता की, योगायोग होता हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

झिरवळ यांची शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराला हजेरी, हे छायाचित्र समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले. अनेक कार्यकर्त्यांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले भारतीय जनता पक्षाने देखील याबाबत गंभीर दखल घेतली आहे. दिंडोरी मतदार संघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार उमेदवार आहेत. डॉ पवार यांच्या प्रचार दौऱ्यात सुरुवातीपासून झिरवळ सहभागी आहेत. मात्र निवडणुकीआधी झिस्वळ यांचे चिरंजीव गोकुळ यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी उत्सुक असल्याचे कळविले होते. या पार्श्वभूमीवर दिंडोरीत समाज माध्यमांवर कार्यकर्त्यांना चर्चेसाठी एक नवा विषय मिळाला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा