साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे यांच्यात वरचढ; पवारनिष्ठा पणाला

0

भारतीय जनता पक्षाने अखेरच्या टप्प्यात साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे येथे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यात ‘हाय होल्टेज’ लढत रंगणार हे स्पष्ट झाले आहे. खरेतर, या मतदारसंघासाठी अजित पवार पहिल्यापासून आग्रही होते. जागावाटपात या मतदारसंघावर आमचाच नैसर्गिक हक्क आहे, असा त्यांचा दावा होता.

इकडे उदयनराजे यांनीही उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तगादा लावला होता. या पेचात अखेर भाजपची सरशी झाली असून, उदयनराजेंचा लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला असला, तरी उदयनराजे यांनी याआधीच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. महायुतीचे तीन मेळावेही झाले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनीही नुकतेच मोठे शक्तिप्रदर्शन करीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

उदयनराजेही मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करतील. पक्षीय बलाबलाचा विचार करता महायुतीकडे चार आमदार, तर आघाडीकडे दोन आमदार आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप), शंभूराज देसाई (शिवसेना शिंदे), मकरंद पाटील (राष्ट्रवादी अजित पवार) आणि महेश शिंदे (शिवसेना- शिंदे) या चार आमदारांची ताकद उदयनराजेंच्या बाजूने आहे. याउलट आघाडीचे आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी- शरद पवार) आणि पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) या दोनच आमदारांची मदत शिंदे यांना होणार आहे. या बलाबलात महायुती प्रबळ दिसत असली, तर प्रत्यक्ष मतदान घडण्यासाठी अनेक ‘फॅक्टर’ काम करणार आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे.

यातील सातारा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजेंचे वर्चस्व असले, तरी याच मतदारसंघातील जावळी हा शशिकांत शिंदे यांचा मूळ (पुनर्रचनेच्या आधीचा) मतदारसंघ आहे. याशिवाय, श्री. शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत मतविभागणी अटळ आहे. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची ताकद उदयनराजेंना मिळू शकते; पण, तेथेही विक्रमसिंह पाटणकर, सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) कार्यरत आहे. शिवाय, पाटणमधील माथाडी कामगार कोणाच्या बाजूने कौल देणार हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर या दोन मतदारसंघांनी याआधीच्या लोकसभा निवडणुकांत अनेकदा भाजप- शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या विरोधात मताधिक्य दिले आहे. यावेळी हे दोन मतदारसंघ काय भूमिका घेतात, यावरही निकाल अवलंबून असेल. वाई मतदारसंघात सध्या मकरंद पाटील यांचे एकहाती वर्चस्व आहे. महायुतीचा घटक म्हणून ते उदयनराजे यांनाच मदत करतील. पण, श्री. पाटील यांचे बंधू हे या लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचे वातावरण आहे. ही नाराजी कोणत्या दिशेला वळणार हे पाहावे लागेल.

वास्तविक, या मतदारसंघातील १९९९ पासूनच्या लोकसभा निवडणुका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. भाजपनेही या मतदारसंघात पाय रोवण्याची शिकस्त केली, पण त्यांना यश आले नव्हते. श्री. पवार यांनी प्रत्येक वेळी पुरोगामी विचारांचा जिल्हा हा मुद्दा ठळकपणे मांडला आणि आत्तापर्यंत लोकांनी त्यांना साथ दिली, ही वस्तुस्थिती आहे. अलीकडे भाजपच्या वतीने मोदी यांनी केलेल्या विकासाचा मुद्दा ठसवला जातोय. लोक कोणता मुद्दा उचलून धरणार यावर निकाल अवलंबून आहे. तात्पर्य, गेल्या २५ वर्षांपासूनचा पवारांचा हा बालेकिल्ला पक्षफुटीनंतरही त्यांनाच साथ देणार, की भाजप तो हिसकावून घेणार याचे उत्तर या निकालात दडलेले आहे.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा