मोहिते पाटलांचंही ठरलं पुण्यात शरद पवारांची भेट; रविवारी होणार प्रवेश; धैर्यशील मोहिते 16 ला अर्ज भरणार

0

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (ता. 11 एप्रिल) पुण्यातील मोदी बागेतील निवास स्थानी जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. धैर्यशील मोहिते पाटील यांचा येत्या रविवारी (ता. 14 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे, तर धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी मंगळवारी (ता. 16 एप्रिल) खुद्द पवार सोलापूरमध्ये येणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

मोहिते पाटील यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस आज अखेर ठरला. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज पुण्यात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि सांगोल्याचे शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

शरद पवार यांच्या भेटीनंतरही धैर्यशील मोहिते पाटील यांनी ‘वेट ॲंड वॉच’चा पाढा कायम ठेवला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत खुद्द शरद पवार यांनीच सूतोवाच केले आहे. येत्या दोन दिवसांत म्हणजे 14 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हा प्रवेशाचा सोहळा अकलूजमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्याबाबत मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीकडूनही दुजोरा मिळू शकलेला नाही.

दरम्यान, पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होत असला तरी येत्या 16 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांचा माढा लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरण्यासाठी खुद्द शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्यामुळे अर्ज भरताना मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणार?

धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणार, याची उत्सुकता आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पुढाकार घेतला होता. ते आणि धैर्यशील मोहिते पाटील हेच माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी प्रचंड आग्रही होते, त्यामुळे धैर्यशील यांच्यासोबत जयसिंह मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकतो.

रणजितसिंह मोहिते पाटलांचा निर्णय काय?

रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपकडून विधान परिषदेचे आमदार झाले आहेत. ते भाजपसोबत राहण्याच्या मानसिकतेचे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांचा निर्णय काय असणार, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला असणार आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार