मोहोळांची मदार वडगाव शेरीवर, तर धंगेकरांचं टार्गेट भाजपचा बालेकिल्ला, पुणे जिंकण्याचा नवा पॅटर्न चर्चेत

0

पुणे : पुणे शहरातील निवडणुकीतील रंगत वाढू लागली असून, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वडगाव शेरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमधील मताधिक्य कमी करणे हे धंगेकराचे लक्ष्य आहे, तर वडगाव शेरी मतदारसंघातील गेल्या निवडणुकीतील मताधिक्य कायम ठेवणे यावर मोहोळ यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

पुणे शहरातून महायुती आणि महाविकास आघाडीने आपआपले उमेदवार जाहीर केले असून, उमेदवारांकडून गाठीभेटींवर भर देण्यात येत आहे. जाहीर प्रचाराला अद्याप सुरुवात झाली नसली तरी एकमेकांच्या कमकुवत बाजू शोधून तेथे आपली पकड मिळवण्यात दोन्हीही उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. हे मताधिक्य कायम राहिल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे हे मताधिक्य कमी करण्यासाठी धंगेकरांकडून पुरेपूर प्रयत्न सुरू केले असून, त्यांनी कोथरूडमध्ये सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसची पकड होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत २०१४ ला या मतदारसंघातून भाजपच्या मतदानाची टक्केवारी वाढली. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार गिरीश बापट यांना ५७ हजारांचे मताधिक्य होते. हे मताधिक्य कायम राहिल्यास कोथरूडच्या मताधिक्यासह भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. वडगाव शेरी येथील काँग्रेसच्या पारंपरिक मतांचा विचार केल्यास या ठिकाणचे भाजपचे मताधिक्य कमी होईल, असा काँग्रेसला विश्वास वाटतो. त्यामुळे त्यांच्याकडून कोथरूडवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, तर मोहोळ यांच्याकडून वडगाव शेरी मतदारसंघात गाठीभेठी वाढवण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

पर्वती आणि कसबा

पर्वती विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत भाजपला ६६ हजार मताधिक्य होते. कसबा विधानसभा मतदारसंघातून ५२ हजारांचे मताधिक्य बापट यांना होते. बापट हे लोकसभेची निवडणूक लढले तेव्हा ते कसब्याचे आमदार आणि पुण्याचे पालकमंत्री होते. त्याचा त्यांना सर्वाधिक फायदा झाला होता. सध्या कसब्याचे विद्यमान आमदार काँग्रेसचे उमेदवार धंगेकर आहेत. त्यामुळे कसब्यातून मोहोळ यांना मताधिक्य मिळणार का? मिळाले तर किती? याबाबत वेगवेगळ्या चर्चा झडत असल्या तरी कसब्याचा बालेकिल्ला भेदणे भाजपसाठी आव्हानात्मक आहे.