‘माझी या विषयात पीएचडी…’; शिक्षणावरुन ट्रोल करणाऱ्या भाजपला रवींद्र धंगेकरांचं सडेतोड उत्तर

0

निवडणुकीचे वारे वाहायला लागल्यानंतर आता पुणे लोकसभा मतदारसंघही चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवेळी ‘हू इज धंगेकर’ असा प्रचार केला होता. आणि आता पुणे लोकसभेतून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर शिक्षणावरुन रवींद्र धंगेकरांना ट्रोल केलं जातंय. पण, धंगेकरांना ट्रोल का केलं जातंय? भाजपच्या या ट्रोलिंगवर धंगेकरांचं काय म्हणणं आहे? हे जाणून घेऊया..

पुणे लोकसभा मतदारसंघ… राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक… शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं. यंदा पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे.

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार? 

कसबा पोटनिवडणुकीवेळी हेमंत रासने भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी भाजपकडून ‘हू इज धंगेकर’ असा धंगेकरांविरुद्ध प्रचार करण्यात आला होता. आणि आता भाजपकडून शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मविआचा अशिक्षित उमेदवार असा प्रचार केला जातोय.

सोशल मीडियावर धंगेकरांच्या शिक्षणाविषयीचं एक प्रमाणपत्र व्हायरल करुन ट्रोल केलं जातंय. त्यावर मागच्या वर्षी ‘हू इज धंगेकर’ हे लोकांना कळलं आणि त्यांनी दिलेलं मत हेच माझ्यासाठी ‘पीएचडी’ आहे, असं म्हणत भाजपच्या ट्रोलिंगला सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

धंगेकरांनी भाजपच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय?

कर्मवीर भाऊराव पाटील, वसंतदादा पाटलांचं शिक्षण काढणार का तुम्ही? जनतेची नाळ अन् जनतेचा विकास यात माझी पीएचडी झाली आहे. जनतेला काय हवं ते मला कळतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षणही आठवी होतं. वसंतदादा पाटील वैद्यकीय शिक्षण पहिल्यांदा महाराष्ट्रात आणलं. ते चौथी पास असल्याचं म्हणतात, असं धंगेकर म्हणाले.

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण

तुम्हाला शिक्षणाचं एवढं ज्ञान आहे तर मग राज्यातील ८३ टक्के तरुण बेरोजगार का फिरताहेत? माझं शिक्षण काढणं हा विरोधकांचा दूधखुळापणा आहे. पुणेकरांमध्ये माझी पीएचडी झाली आहे, त्यांनी मला त्याचं सर्टिफिकेट कधीच देऊन ठेवलंय.”, असं धंगेकर म्हणालेत.