कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा तब्बल 11000 मतांनी विजय झाला होता. त्यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विशाल धनवडे हे बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते. त्यांनी तब्बल 16000 मते घेतली होती. हीच मते कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना मिळाली आणि त्यांचा विजय झाला, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते विशाल धनवडे यांनी केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये कसबा विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, अशी मागणी करत या जागेवरून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे विशाल धनवडेंनी सांगितलं आहे.
कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने विजय मिळाला होता. महाविकास आघाडीतील एकत्रित प्रयत्नांनी धंगेकरांनी हा विजय खेचून आणला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील असाच चमत्कार होऊन धंगेकर पुण्याचे खासदार होतील, असं महाविकास आघाडीला वाटत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धंगेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत असलेली एकी या लोकसभेला राहणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारण निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
लोकसभा निवड निवडणुकीच्या नियोजनासाठी नुकतीच काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीत शिवसेनेकडून कसबा विधानसभा आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला सोडावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. याबाबत आता विशाल धनवडे यांनी माध्यमांसमोर आपले मत मांडले आहे. धनवडे म्हणाले, “महाविकास आघाडीची काँग्रेस भवनमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभेसाठी प्रचार यंत्रणा कशी राबवावी या संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांमध्ये कसबाची जागा ठाकरे गटाला द्यावी, अशी मागणी केली. कारण कसबा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम करून धंगेकरांना आमदार बनवलं.”
“लोकसभेला ही सर्व शिवसैनिक धगेकरांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. पण, यापूर्वी देखील शिवसेनेनं कसब्यामध्ये भाजपाचा आमदार निवडून येण्यास मदत केली. यावेळी काँग्रेसच्या आमदार निवडून येण्यास मदत केली, असं करत असताना शिवसैनिकांना जो न्याय मिळायला हवा तो मिळत नाही. त्यामुळे कसब्याची जागा आम्हाला मिळावी,” अशी भूमिका धनकवडेंनी मांडली.
कसबा विधानसभा मतदारसंघ हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मस्थान आहे. पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात शिवसेना वाढली. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळण्यासाठी आग्रही असल्याचं धनवडेंनी सांगितलं. मात्र, ही मागणी करत असताना आम्ही रवींद्र धंगेकरांचं लोकसभेचं काम करणार नाही, अशी कोणती भूमिका घेतली नसल्याचं धनवडेंनी स्पष्ट केलं.