पहिल्या यादीत नाव नाही, संन्यास घेणार का?; उदयनराजे यांचं सर्वात मोठं विधान काय?

0
6

भाजपच्या लोकसभेच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत जुन्या आणि नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जुन्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. तर संधी मिळाल्याने अनेकांना आनंदही झाला आहे. मात्र, काही महत्त्वाच्या नेत्यांना भाजपने अजूनही वेटिंगवर ठेवले आहे. राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले हे त्यापैकी एक. उदयनराजे भोसले यांची अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक चांगलेच संतापले आहेत. उदयनराजे यांनी उमेदवारी न मिळाल्यास स्वबळावर लढावं अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याबद्दल बोलणं औचित्य ठरणार नाही. तीन पक्ष एकत्र आले आहेत. सीट वाटपात पुढे मागे होईल. प्रत्येकाला वाटतं जास्त सीट मिळाव्यात आणि ते रास्त आहे. त्यात चुकीचं नाहीये. जे काही होईल त्यानंतर बघू, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

माझ्याकडे तिकीट आहे
तुमचा पुढचा निर्णय काय असेल? असा सवाल उदयनराजे यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी काही संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो. संन्यास घेणार नाही यात आलं ना सगळं, असं सांगतानाच माझ्याकडे तिकीट आहे. प्लेनचं आहे. बसचं आहे. रेल्वेचं आहे. पिक्चरचं आहे. बस आहे ना? बाकीच्यांच्या तिकीटाचं माहीत नाही. ते ठरवतील त्यावेळी बघू, असं उदयनराजे म्हणाले.

समर्थक नाराज
उदयनराजे भोसले यांचं नाव पहिल्या यादीत आलेलं नाही. त्यामुळे उदयनराजे यांचे समर्थक नाराज झाले होते. उदयनराजे यांचे समर्थक काल शिवतीर्थावर जमले होते. यावेळी या समर्थकांनी भाजपवर नाराजी आणि संताप व्यक्त केला. उदयनराजे यांना निवडणुकीचं तिकीट दिलं पाहिजे, अशी मागणी करतानाच तिकीट मिळणार नसेल तर उदयनराजे यांनी स्वबळावर लढलं पाहिजे, अशी मागणी या समर्थकांनी केली आहे. त्यामुळे उदयनराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

पत्ते उघडले नाही
उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. उदयनराजे यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा अजून दाखवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. उदयनराजे यांना भाजपने पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं होतं. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. उदयनराजे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळाची दोन वर्ष बाकी आहेत. त्यामुळे भाजप त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार की नाही याबाबतचा सस्पेन्सही अजून कायम आहे.