कडक उन अंगावर घेत बारामतीत आज जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला. एरवी पावसाचे थेंब अंगावर घेत वारकरी मार्गक्रमण करतात, आज मात्र उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या उन्हाने वारकरी हैराण झाले. मात्र विठुरायाच्या ओढीने उन्हाची तमा न बाळगता पालखी सोहळा बारामतीत दाखल झाला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी सपत्नीक पालखी सोहळ्याचे बारामतीच्या वेशीवर स्वागत केले. अजित पवार यांनी पालखीचे सारथ्यही केले. पालखीचे बारामतीत भक्तीमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती. बारामती शहराच्या वेशीवर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध मंडळांचे प्रमुख यांनी पालखीचे प्रथेनुसार स्वागत केले. बारामती नगरपालिकेच्या वतीने पालखीतील सर्व वीणेक-यांचे हार घालून श्रीफल देऊन स्वागत केले गेले. बारामती नगरपालिकेने आज पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. शारदा प्रांगणात पालखी सोहळ्याचा मुक्काम असून या प्रांगणात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. भाविकांनी पालखीच्या आगमनानंतर दर्शनासाठी एकच गर्दी केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक व प्रभाकर मोरे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.






एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पालखी सोहळ्यातील दीड हजार वारक-यांना कापडी पिशवी व स्वच्छता किट प्रदान करण्यात आली. अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वारक-यांना या कीटचे वाटप केले गेले. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व सहकारी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. श्रायबर डायनामिक्स डेअरीच्या वतीने थंड पाण्याचे टॅंकर वारक-यांच्या सोयीसाठी देण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख जितेंद्र जाधव यांनी दिली.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आज बारामतीकरांनी भक्तीभावाने सेवा केली. शहरातील अनेक सामाजिक संस्था,संघटना, मंडळांनी पालखी सोबत असणाऱ्या वारकऱ्यांना चहा ,नाष्टा, जेवण, कपडे औषध वाटप, आरोग्य तपासणी, कपडे वाटप आदी सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामतीत भक्तीभावाने व उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शहरातील अनेक संस्था व संघटनांच्या वतीने वारक-यांसाठी विविध वस्तू व प्रसादाचे वाटप केले. बारामती वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत शेकडो वारकऱ्यांना अल्पोपहार म्हणून बिस्कीटपुडे वाटण्यात आली यावेळी रमेश दुधाळ, फैय्याज शेख, शाम राऊत, अप्पा घुमटकर, सुरज चव्हाण, प्रकाश शिंदे, अनिकेत धालपे, प्रकाश उबाळे राजेंद्र हगवणे, पांडुरंग हगवणे, रोहन हगवणे इत्यादी विक्रेते उपस्थित होते.
बारामती तालुका मंडप मालक असोसिएशनच्या वतीने खाद्यपदार्थ, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार, मोता परीवाराच्या वतीने मोफत कपडे वाटप पार पडले. युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सचिन गालिंदे व सहकाऱ्यांच्या वतीने अन्नदान, महात्मा गांधी चौक, अखिल तांदुळवाडी चौक यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. योगेश चिंचकर मित्र परीवाराच्या वतीने सचिन चिंचकर व अजित चिंचकर या बंधूंनी नाश्त्याची सोय केली. बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठानकडून पाणी वाटप झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या वतीने मोफत औषधोपचार व आरोग्य तपासणी करण्यात आली होती.
बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने मोफत औषधोपचार व तपासणी करण्यात आली. आरएन बॉयलर यांच्या वतीने केळी वाटप, चंदुकाका सराफ यांच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले. बारामती येथील उपप्रादेशिक परीवहन विभागाच्या वतीने मोफत औषधोपचार तसेच वारकऱ्यांचे मसाज करण्यात आले. पुणे जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाने जनजागृती केली. अजय माने यांच्या वतीने पाणी व बिस्किटे वाटप करण्यात आली. माई फाउंडेशन, सिंहगर्जना प्रतिष्ठान, सह्याद्री सोशल फाउंडेशन, मृत्यूंजय प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ यांच्या वतीने वारकऱ्यांना मदत करण्यात आली.










