पुण्यातही धक्कादायक घटना! रिक्षातून मृतदेह शववाहिनी नसल्याने आली वेळ

0

असंवेदनशील प्रशासकीय कारभाराचा मोठा फटका कॅन्टोन्मेंटमधील एका कुटुंबाला बसला असून, शववाहिनीसाठी चालक उपलब्ध नसल्याने मृतदेह रिक्षातून नेण्याची वेळ त्यांच्यावर आली. सोमवारी रात्री साडे दहाला हा प्रकार घडला. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वाहन विभागात गाडीला चालक उपलब्ध नसल्याने ही वेळ आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. नवा मोदीखाना कॅम्प येथून केवळ ५०० मीटर अंतरावरील पटेल रुग्णालयात घरी मृत्यु झालेल्या ९५ वर्षीय वृद्धेला शवागारात ठेवण्यासाठी रात्री १० वाजता घेऊन जायचे होते. नातेवाइकांनी बोर्डाचे धोबी घाट येथील वाहन तळ गाठले. मात्र, त्या ठिकाणी शववाहिनी चालविण्यासाठी चालकच नव्हता. दरम्यान, वाहन तळप्रमुख बंडू गुजर आणि सहायक अशपाक शेख यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद लागत होता. नाइलाजाने मृतदेह रिक्षामधून शवागारात नेण्यात आला. मात्र, शवागारही बंद होते. नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता कर्तव्यावरील नर्सने माहिती देण्यास टाळाटाळ केली. डॉक्टर म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. निवासी वैद्यकीय अधीक्षकांचा बंगलादेखील बंद होता. त्यानंतर ससून रुग्णालयातील शवागारात मृतदेह हलविण्यात आला.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

शववाहिनी, शवागारासारख्या आवश्यक सुविधा कॅन्टोन्मेंट बोर्ड देऊ शकत नसेल, तर कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत विलीन करा. आज नातेवाईक मित्र आहेत. म्हणून आम्ही धावपळ करतोय. जर एखादा गरीब आणि सोबत कुणी नसेल, तर त्यांचे काय हाल होतील?

मृताचे नातेवाईक

तीन वर्षांपूर्वी शवागार बनवले आहे. याबाबत मी वेळोवेळी विद्युत अधीक्षकांशी बोलले आहे; परंतु त्याची दुरुस्ती त्यांच्याकडून होत नाही. नवीन शवागार यंत्राची खरेदी कागदपत्रे सापडत नाहीत. त्यामुळे कंपनीशी बोलताना समस्या येते.

-डॉ. उषा तपासे, निवासी वैद्यकीय अधीक्षक

मी दोन दिवस सुटीवर आहे, बोडांकडून सध्या चालकांची कमतरता आहे. दोन महिन्यांपूर्वी रात्रपाळी करणाऱ्या चालकाचे निधन झाल्याने ही समस्या उद्भवली आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

– बंडू गुजर, अधीक्षक, वाहन विभाग