नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे नुकतीच मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी बैठक झाली होती.त्यानंतर आता दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या राजकारणात सध्या अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. असे असताना आताच्या घडीला पडद्यामागे काय घडतंय ते आगामी काळासाठी महत्त्वाचं असणार आहे.






सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार आज रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी जाणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला राहुल गांधी हे सुद्धा असणार आहेत. शरद पवार यांची ही भेट महत्त्वाची असणार आहे. नुकतंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत आले होते. त्यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान गेल्या दोन दिवसांत विरोधकांच्या महत्त्वाच्या बैठकादेखील पार पडल्या. पण या दोन दिवसांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कुणीच उपस्थित नव्हतं. त्यानंतर आज शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत.
शरद पवारांनी विरोध केल्यानंतरही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका अद्याप बदललेली नाही. याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काही जागांवर निवडणूक लढू शकते. याबाबत कोणत्या जागांवर निवडणूक लढवायची या विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विरोधकांकडून वारंवार उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीएस चौकशीची मागणी केली जात आहे. पण गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी जेपीएस चौकशीची गरज नाही. त्यासाठी कोर्टाची समिती गठीत करुन चौकशी करता येईल, अशी भूमिका मांडलेली. पण त्यांच्या या भूमिकेवर अनेकांना धक्का बसलेला. इतर विरोधी पक्ष हे अदानी यांच्या जेपीएस चौकशीच्या मागणीवर ठाम आहेत. याबाबत विरोधी पक्षातच मतभेद समोर असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर पवारांनी आपली भूमिका बदलली. इतर विरोधी पक्षांची जेपीएस चौकशीची मागणी असेल तर आपला त्याला पाठिंबा असल्याचं त्यांनी नंतर स्पष्ट केल्याची माहिती समोर आलेली.दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर आता शरद पवार आणि राहुल गांधी यांची भेट होताना दिसत आहे.











