मुंबई-ठाण्यात ED चे छापे 1 कोटी जप्त केंद्रीय अधिकारी असल्याचा भास 113 कोटींच्या क्रिप्टो फसवणुकीचा पर्दाफाश

0

मुंबई : ‘मनी ट्रेड कॉइन’मध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ११३ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.

या छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे १ कोटी रुपयांची रोकड, महत्त्वाची कागदपत्रे तसेच डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या विविध पैलूंचा तपास ईडीकडून सुरू आहे.

या प्रकरणाच्या तपासात अमित लखानपालसह चौघांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. लखानपाल याने स्वतःला केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे भासवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना ‘मनी ट्रेड कॉइन’मध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

अधिक वाचा  भाजपाचे पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी पुण्यावर विशेष लक्ष; कारवाईच्या भीतीने नगरसेवकांचा मतदारांशी संपर्क?

गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, अपेक्षित परतावा न मिळाल्याने या व्यवहारामागील फसवणुकीचा प्रकार समोर आला.तपासादरम्यान आरोपींकडे अँटिग्वा आणि बार्बुडा देशाचे पासपोर्ट आढळल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अमित लखानपाल हा सध्या दुबईत राहत असल्याचे तपासातून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, परदेशातील कनेक्शन आणि आरोपींच्या मालमत्तेबाबतही ईडीकडून तपास केला जात आहे.

ठाणे पोलिसांच्या मूळ गुन्ह्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांची साखळी तपासताना ईडीने ही छापेमारी केली. जप्त करण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांमधून आणि कागदपत्रांमधून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

११३ कोटींच्या या कथित क्रिप्टो फसवणूकप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, परदेशात पैशांचे व्यवहार झाले आहेत का आणि गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या रकमेचा नेमका वापर कुठे करण्यात आला, याचा तपास ईडीकडून सुरू आहे.