राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी कोलमडून गेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पूर्म पीकच वाहून गेले आहे.हाता-तोंडाशी आलेल्या पिकाची नासधूस झाली आहे. काही लोकांच्या घरात पाणी शिरले आहे तर काही गावांत लोकांची घरे अक्षरश: पडून गेली आहेत. दरम्यान, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत करावी अशी मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. असे असतानाच आता सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीचे संभाव्य स्वरुप समोर आले आहे. लवकरच या मदतीचे वाटप चालू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






कोणत्या नुकसानीस किती रुपये शक्य?
सरकार अतिवृष्टीग्रस्तांना अतितातडीची मदत करणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तर उणे बजेटमधून ही मदत केली जाण्याची शक्यता आहे. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 4 लाखांची मदत दिली जाऊ शकते. तसेच दुग्धप्राण्यांचा मृत्यू झाल्यास 37 हजार 500 रुपयांची मदत दिली जाण्याची शक्यता आहे. मेहनतीचे (ओढ काम) काम करणाऱ्या जणाऱ्या जनावरे दगावल्यास 32 हजार रुपयांची मदत केली जाईल असे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार घरांची पडझड झाल्यास प्रति झोपडी 8 हजार रुपयांची मदत दिली जाईल. तसेच पक्क्या घरांची पडझड झाल्यास ही मदत 12 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते.
केंद्राकडे मागितली जाणार मदत
दरम्यान, शेतकरी, स्थानिक लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, असे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकारनेही महाराष्ट्रात शेतकरी हवालदील झाल्याचे मान्य केले आहे. सरकारकडून मदतीचे निकष बाजूला ठेवून मदत दिली जाईल, असेही सांगितले जात आहे. राज्यातील नुकसान मोठे असल्यामुळे आता राज्य सरकार केंद्र सरकारला पत्र लिहून मोठ्या आर्थिक मदतीची मागणी करणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राज्याला नेमके किती रुपये देणार? राज्य सरकार नेमकी किती आणि कशी मदत करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.










