नगरसेवकांसाठी आनंदाची बातमी अंतिम प्रभाग रचनेची २६ ते ३० सप्टेंबरला प्रसिद्धी; उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांची माहिती 

0

पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि 3 नगर पंचायतींच्या प्रभार रचनांचे प्रारूप आराखड्यांवरील हरकती व सूचनांची सुनावणी पूर्ण होऊन त्यात आवश्यक ते बदल करून हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाची छाननी करून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे येणार आहे. अंतिम प्रभाग रचना २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि ३ नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभार रचना अंतिम करण्याचे काम सध्या सुरू आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ४१८ हरकती व सूचना आल्या होत्या. यात १४ नगर परिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर २८२ हरकती आणि सूचना आल्या आहेत. तर, तीन नगर पंचायतींवर १३६ हरकती व सूचना आल्या होत्या. त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ३ व ४ सप्टेंबरदरम्यान सुनावणी घेतली. त्यानंतर संंबंधितांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर ही प्रभाग रचना सुधारित करण्यात आली. प्रारूप प्रभाग रचनेत नैसर्गिक हद्द विचारात घेतली नसल्याची, नदी-नालेच्या पलीकडे प्रभाग तयार केल्याची, वस्ती एकसंध न ठेवल्याची, अशा विविध हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

नगर परिषदांसाठी ९ ते ११ सप्टेंबर आणि नगरपंचायतींसाठी ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान प्रस्ताव अंतिम प्रभाग मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार होता. त्यानुसार सुधारित प्रभाग रचना आता ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आली आहे. विभागाकडून या रचनेची छाननी करून हा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या विभागीय आयुक्तांकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर त्यांवर अंतिम मान्यतेची मोहोर उमटणार आहे. या अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी गॅझेटद्वारे २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील नगर विकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर