महाराष्ट्रात नुकतेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केलं होते. मराठा समाज राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आंदोलकांची संख्या आणि आंदोलनाचा आक्रमकपणा पाहून सरकारच्या वतीने आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानुसार, पूर्ण महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचाही जीआर निघाला आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत मराठवाड्यातील काही मराठा समाजाला कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाविरुद्ध ओबीसी समाज एकटवला असून कोर्टात आव्हान देण्या ची शक्यता लक्षात घेऊन मराठा समाजाच्या वतीने शासकीय हरकती याचिका दाखल होण्याची वाट न पाहता त्रयस्थपणे आता याप्रकरणी, सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे.






राज्य सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेटियर शासन निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. आंदोलकांची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय होऊ नये यासाठी ॲड. राज पाटील यांच्यावतीने हे कॅव्हेट(याचिका) दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या GR (शासन निर्णया) ला कोणी आव्हान दिलं तर आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय केला जाऊ नये, असे म्हणणे मांडत कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे, सरकारच्या जीआर विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यास आता आंदोलकांची बाजू देखील ऐकली जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारनेही कॅव्हेट दाखल करावे अशी मागणी वकील राज पाटील यांच्यावतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल झाल्यामुळे आता हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेत आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतरच निर्णय होईल. त्यामुळे, कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील शासन निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्यांना संपूर्ण तयारीनिशी व अभ्यासपूर्ण दस्तावेजसह सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडावी लागेल. मराठा समाजाच्या वतीने न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याच्या हेतूने जरी ही याचिका दाखल करण्यात आली असली तरी सुद्धा या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत जर अध्यादेश स्थगित ठेवण्यात आला तर समाजाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.











