उजनीत सध्या दौंडवरून उजनीत सध्या ४१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. धरण ९७ टक्क्यांपर्यंत भरल्याने भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे पंढरपुरातील जुना दगडी पूल सध्या पाण्याखाली गेला आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात हवामान खात्याने आज (रविवारी) रेड अलर्ट सांगितला आहे. त्यामुळे दौंडवरून येणारा विसर्ग वाढल्यास उजनीतून भीमा नदीतील विसर्ग आणखी वाढविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दौंडवरून उजनीत येणारा विसर्ग कमी झाल्याने भीमा नदीतील पाणी बंद करण्यात आले होते, पण मागील चार-पाच दिवसांत पावसाला पुन्हा सुरवात झाल्याने आता उजनीचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. सध्या उजनीचे १६ दरवाजे एक मीटरने उघडले असून धरणातून ५० हजारांवर विसर्ग नदीत सोडला आहे. याशिवाय बोगद्यातून ४०० क्युसेक, कालव्यातून ११०० क्युसेक, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून २६० क्युसेक आणि धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले आहे. शुक्रवारी पहिल्यांदा भीमा नदीत पाच हजार क्युसेक पाणी सोडले आणि रविवारी सकाळी तो विसर्ग ५० हजार करण्यात आला आहे. वीर धरण ९५ टक्के भरल्याने सध्या वीरमधून नदीतून १४ हजार ६२७ क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
महिन्यात उजनीतून सोडले ३९ टीएमसी पाणी
२६ मे रोजी उणे पातळीतून प्लसमध्ये आलेल्या उजनीत सध्या ऑगस्टअखेर जेवढा पाणीसाठा अपेक्षित आहेत, तेवढे पाणी आहे. २० जूनपासून उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यास सुरवात झाली. आता उजनीत ९७.१४ टक्के (११५.७२ टीएमसी) पाणीसाठा असून २० जून ते २७ जुलैपर्यंत धरणातून ३९ टीएमसी पाणी सोडून देण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापन विभागाने दिली.
पंढरपूरला १.१६ लाख क्युसेकनंतर पुराचा धोका
भीमा नदी पात्रात एक लाख क्युसेकपर्यंत विसर्ग मावतो. एक लाख १६ हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत झाल्यावर पंढरपूरला पुराचा धाको संभवतो. सध्याच्या विसर्गात पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली जातो, अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिली. तरीपण, नदी काठावरील सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उजनी धरणाची सद्यस्थिती
उजनीत दौंडवरून ४५ हजार तर वीरमध्ये १७ हजार क्युसेकची आवक
उजनीत ऑगस्टअखेर ९६ टक्के पाणीसाठा अपेक्षित, पण सध्या धरण ९७.१४ टक्के भरले
उजनीतून सोडलेले पाणी उद्या (सोमवारी) सकाळी नऊपर्यंत पोचणार, नदी काठावर सतर्कतेचा इशारा
आज (रविवारी) मध्यरात्री पंढरीतील जुना दगडी पूल पाण्याखाली
दौंडवरून येणारा विसर्ग वाढल्याने उजनीचे १६ दरवाजे एक मीटरने उघडले