आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडी, पाणी साचणे, अतिक्रमण आणि रस्त्यांची दयनीय अवस्था या समस्यांवर उपमुख्यमंत्री आणि पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी थेट दखल घेतली. सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी स्वतः हिंजवडी परिसरात भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि नंतर पीएमआरडीए कार्यालयात आढावा बैठक घेत कडक निर्देश दिले.
राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील वाहतूक सुरळीत आणि अडथळाविना सुरू राहावी यासाठी तातडीने रस्ते रुंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. केवळ रुंदीकरण नव्हे, तर पर्यायी रस्त्यांचाही प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. “उशीर नको, कामाला लागा,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यास सांगितले.
अजित पवार यांनी हिंजवडी, मान आणि मरुंजी या परिसरातील नैसर्गिक नाले अडवल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “नाले मोकळे करा. अतिक्रमण काढा. कोणतीही सबब चालणार नाही.” त्यांच्या निरीक्षणात काही ठिकाणी पावसाचे पाणी साचण्यामागे बाधित नैसर्गिक प्रवाह आणि अनधिकृत बांधकामे जबाबदार असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी ड्रेनेज लाईनवर झालेल्या अतिक्रमणांवर तत्काळ तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
बैठकीत मेट्रो लाईन ३ च्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यांनी टाटा समूह आणि मेट्रो प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिले. पीएमआरडीए आयुक्तांनी हिंजवडीमधील सुरू असलेल्या कामांबाबत आणि रिंगरोड प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सादरीकरण केले.
या बैठकीला आमदार शंकर मांडके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, सहआयुक्त शशिकांत महावारकर, प्रमुख अभियंता रिनाज पठाण आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रस्ते रुंद करताना बाधित नागरिकांचे नुकसान भरून द्या, पण काम थांबू देऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. “जर रस्ता आधीच सरकारी मालकीचा असेल, तर त्यासाठी पुन्हा पैसे देण्याचं कारण नाही. जेथे शक्य आहे तिथे चार पदरी रस्ते करा. अरुंद रस्ते नकोत,” असं स्पष्ट करत त्यांनी निर्णयक्षमता दाखवण्याचा आदेश दिला.
अजित पवार यांच्या या पहाटेच्या दौऱ्याने प्रशासन हलल्याचं चित्र होतं. त्यांच्या थेट निरीक्षणानंतर अधिकाऱ्यांनी कामासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. हिंजवडी आणि आसपासच्या भागात कामाचा वेग वाढवून रस्ते, नाले आणि अतिक्रमणविरहित वाहतूक मार्ग लवकरच पाहायला मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.