वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सध्या नवनवीन खुलासे होत आहेत. यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नवी माहिती सांगितली आहे. वैष्णवी हगवणे हिची नणंद करिष्मा हगवणे हिने राज्य महिला आयोगात आपला भाऊ आणि भावजय यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच वैष्णवीच्या कुटुंबीयांकडूनही महिला आयोगात कोणतीही तक्रार केली नसल्याचे चाकणकरांनी म्हटले.






रुपाली चाकणकर म्हणाल्या, वैष्णवीच्या नणंद करिष्मा हगवणे हिने ६ नोव्हेंबर २०२४ला राज्य महिला आयोगात आपला भाऊ आणि भावजय यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ७ नोव्हेंबर २०२४ला राज्या महिला आयोगाने तातडीने दखल घेत पौंड पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी हा कुटुंबातील वाद सामोपचाराने मिटवण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार यामध्ये कौन्सलिंग करत हा वाद मिटवण्यात आला होता.
चाकणकरांनी पुढे ‘वैष्णवीने जी आत्महत्या केली. त्यासंदर्भात तिच्या स्वतःकडून किंवा तिच्या माहेरच्या लोकांकडून राज्य महिला आयोगाला कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नव्हती,’ असे स्पष्ट केले आहे. तर राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल करत १९ मे ला पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले.
चाकणकर पुढे म्हणाल्या, व्यक्ती कोणत्याही पदावर असू दे किंवा कोणीही असू दे तो गुन्हेगार आहे. ‘राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदावर नव्हते त्यांचा मुलगा हा पक्षाचा काम करत होता. हुंडाबंदीसाठी राज्यात मोठी मोहीम राबवली जाते यापुढे जर कोणी हुंडा मागत असेल, तर तातडीने पोलिसांत तक्रार करा, हे मी आवाहन करत आहे. वैष्णवीने आपल्या आयुष्याचा केलेला शेवट हा अत्यंत दुर्दैवी आहे,’ असेही चाकणकरांनी नमूद केले.











