मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (२४) हिने आत्महत्या केली की, तिची हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्यात आला, याचा छडा लावणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. अशातच या घटनेवरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.






सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांनी मुलाला घेऊन पलायन केले आहे. दरम्यान, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलीस राजेंद्र हगवणे यांचा शोध घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने या घटनेला राजकीय वळण मिळाले आहे.
हत्या झाल्याचा संशय –
प्राथमिकदृष्ट्या ही घटना आत्महत्येसारखी वाटत असली, तरीही शरीरावरील मारहाणीच्या खुणा आणि गळ्याभोवताली असलेल्या स्पष्ट खुणा पाहता, ही हत्या असल्याचा संशय नातेवाईकांना आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास खुनाच्या अनुषंगाने सुरू केला आहे. बावधन पोलिसांनी डॉक्टरांचा अहवाल प्राप्त करून पुढील तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक अहवाल, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, तसेच आरोपींची पार्श्वभूमी यांचा अभ्यास करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान याबाबत बोलताना भाजप आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, ”दोन वर्षांपूर्वी लग्न आणि अवघ्या २३व्या वर्षी एका नवविवाहित मुलीने आपलं आयुष्य संपवलं – कारण हुंड्याची छळवणूक…! दुर्दैवाने ही घटना राष्ट्रवादी नेता राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली आहे. वैष्णवी ही हगवणेंची सून होती. या केसमध्ये मी स्वतः पोलिसांशी बोलले असून नवरा, सासू, नणंद अटकेत आहेत. तर दीर आणि सासरा राजेंद्र हगवणे फरार आहेत. ते ही लवकरच पकडले जातील.”











