माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 29 एप्रिल रोजी प्रीती सुदान यांचा कार्यकाळ संपल्यानंतर यूपीएससी अध्यक्षपद रिक्त झाले होते. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार, अजय कुमार यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिली आहे. केरळ केडरच्या 1985 च्या बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी अजय कुमार यांनी 23ऑगस्ट 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत संरक्षण सचिव म्हणून काम पाहिले.
माजी आयएएस अधिकारी अजय कुमार हे संरक्षण मंत्रालयात सर्वात जास्त काळ सचिव राहिले आहेत. याशिवाय त्यांनी संरक्षण उत्पादन विभागात सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे महासंचालक अशी अनेक पदे भूषवली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2014 मध्ये डिजिटल इंडिया उपक्रम राबवणाऱ्या टीमचा ते एक भाग होते.
अजय कुमार हे आयआयटी कानपूर आणि मिनेसोटा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी कानपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. यानंतर, ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी विकास अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आणि त्यानंतर त्याच विद्यापीठाच्या कार्लसन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवसाय प्रशासनात पीएचडी देखील मिळवली.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते भारतात परतले आणि यूपीएससीची परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले. त्यांना केरळ केडर देण्यात आले. अजय कुमार यांनी केरळमध्ये तीन दशके सेवा केली आहे. 2007 ते 2010 पर्यंत ते केरळ सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव होते.
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा), आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) आणि आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) आणि विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी नागरी सेवा परीक्षा घेते. त्याचे नेतृत्व एका अध्यक्षाद्वारे केले जाते, ज्याची जबाबदारी आता अजय कुमार घेतील. यूपीएससीमध्ये जास्तीत जास्त 10 सदस्य असू शकतात. यूपीएससी अध्यक्षांची नियुक्ती 6 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा त्यांचे वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत केली जाते.