नगर तालुक्यातील सुभेदार मेजर, ऑर्डिनरी लेफ्टनंट बाळासाहेब मोकाटे व हवालदार सुंदर मोकाटे या दोघा सख्ख्या भावांनी कारगिल युद्धावेळी राखीव सैन्यदलात राहून प्रत्यक्ष सीमेवर लढणाऱ्या सैन्यासाठी दारुगोळा व शस्त्रसाठा पुरवण्याचे काम केले. त्यानंतर बाळासाहेब मोकाटे यांनी कारगिल द्रास भागात सुमारे दोन वर्षे निगराणी ठेवून शत्रूला एक इंचभरही हालचाल करण्यास संधी दिली नाही, तर सुंदर मोकाटे यांनी जव्हार टनेल भागातील अनंतनाग व बनियाल भागात अतिरेकी कारवायांना पायबंद घालत अनेक अतिरेक्यांना यमसदनी पाठवण्याची कामगिरी बजावली.
नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर या छोट्याशा गावातील खंडू आसाराम मोकाटे यांना गोविंद, बाळासाहेब व सुंदर मोकाटे ही तीन मुलं. गोविंद मोकाटे हे बांधकाम व्यवसायाकडे वळाले. त्यांनी नंतर पंचायत समिती सदस्य म्हणूनही काम केले. बाळासाहेब मोकाटे व सुंदर मोकाटे हे दोघे सैन्य दलात दाखल झाले. कारगिल युद्धा वेळी बाळासाहेब व सुंदर मोकाटे हे पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे पाच मराठा लाईट इन्फंट्री युनिटमध्ये तैनात होते.
युद्धावळी त्यांच्या युनिटला जम्मू, श्रीनगर भागातील युद्धभूमी जवळ पाचारण करण्यात आले. प्रत्यक्ष युद्धकाळात सीमेवरील सैनिकांना शस्त्रसाठा पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. युद्धानंतर मात्र 2003 ते 2005 या काळात बाळासाहेब मोकाटे हे ज्या ठिकाणी कारगिल युद्ध घडले, त्याच युनिटवरती तैनात होते. सुमारे 25 डिग्री सेल्सिअस तापमानात डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस शत्रूवर नजर ठेवण्याचे काम त्यांनी केले. या काळात आमच्या युनिटमधील एकही सैनिक साधा जखमीही होऊ दिला नाही. परंतु आमच्या युनिटने शत्रू राष्ट्राचे अनेक बंकर उद्ध्वस्त केल्याचे बाळासाहेब मोकाटे यांनी अभिमानाने सांगितले.
त्याच वेळी सुंदर मोकाटे यांनी राष्ट्रीय रायफलमध्ये काम करत जव्हार टनेल जवळील बनियाल, अखनूर भागात अतिरेक्यांना शोधून त्यांना यमसदनी धाडले.
बाळासाहेब मोकाटे हे 31 वर्षांच्या सेवेनंतर सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. सध्या ते पत्नी नंदा यांच्यासह शेती करत आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवेत जाण्यासाठी ते तयारी करत आहेत. सैन्य दलातील जम्मू काश्मीर, मणिपूर, नागालँड अशा दुर्गम भागात कठीण परिस्थितीत देश सेवा केली. सेवा काळात बाळासाहेब मोकाटे यांना दहा, तर सुंदर यांना सहा पदके मिळाली.
सुंदर मोकाटे यांनी भारतीय सैन्य दलाच्या वतीने दक्षिण आफ्रिकेमध्ये सहा महिने शांती सेनेत काम केले. सुंदर यांच्या पत्नीचे नाव सविता आहे. ते सध्या पुणे जिल्ह्यात खासगी नोकरी करत आहेत. दोघा माजी सैनिकांसह संपूर्ण मोकाटे कुटुंबियांना देशाबद्दल प्रचंड अभिमान आहे. देशाने परत युद्धभूमीवर लढाईसाठी बोलावले, तर जाण्याची तयारी असल्याचे मोकाटे बांधवांनी अभिमानाने सांगितले.
सापळाच उरत होता…
बाळासाहेब मोकाटे यांच्या कारगिल भागातील आठवणी बाबत सांगताना अंगावर शहारे येत होते. या भागात उणे 25 डिग्री तापमानात पाणी पिण्यासाठी बर्फ तोडून तो गॅसवर किंवा केरोसीनच्या शेगडीवर गरम करून वितळावा लागत होता. ऑक्सिजन कमी मिळत असल्याने धाप लागत होती. दहा पावलं जरी चाललं तरी दहा मिनिटं थांबावच लागत होतं. ऑक्सिजन कमी असल्यामुळे जेवणही जात नव्हते. नेहमीच्या तुलनेत अवघे 25% जेवण जात होते. एक वर्षाच्या सेवेनंतर खाली बेस कॅम्प वरती येताना अक्षरशः हाडाचा सापळा राहत होता, अशी माहिती बाळासाहेब मोकाटे यांनी दिली. अतिरेक्यांची शोध मोहीम सुरू असताना जीव मुठीत धरून हालचाली कराव्या लागत होत्या, असेही सुंदर मोकाटे यांनी सांगितले.