सूर्याच्या आगीत राज्य भाजून निघत असताना आता वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे. शनिवारी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात ऊन असह्य होत असून, जमीन अक्षरशः करपून निघत आहे. उकाड्याने घामाच्या धारादेखील त्रासदायक ठरत आहेत. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपिटीची नोंद झाली. कोल्हापुरातील हातकणंगले, सांगलीतील कसबेडिग्रज, जत येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला आणि चंद्रपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, नागपूर, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, वर्धा येथे ४४ अंशांपेक्षा अधिक, जळगाव, जेऊर, मालेगाव, परभणी आणि वाशीम येथे ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
शुक्रवारच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे (४०.५-२४), धुळे (४२.५-२०.६), जळगाव (४३.२-२५.६), जेऊर (४३.५-२४), कोल्हापूर (३४.३-२२.३)
महाबळेश्वर (३२.६-२१), मालेगाव (४३-२४.६), नाशिक (३८.३-२१.९), निफाड (३९.८-२०.५), सांगली (३५.८-२४.६), सातारा (४०.३-२४.६), सोलापूर (४२.३-२८.९), सांताक्रूझ (३३.७-२४.६), डहाणू (३५-२३.९), रत्नागिरी (३३.५-२५.८), छत्रपती संभाजीनगर (४१.४-२६.६), धाराशिव (४२-२५), परभणी (४३.४-२५.६), अकोला (४५.२-२७.२)
अमरावती (४४.२-२३.९, भंडारा (४२.४-२५), बुलडाणा (४०.६-२७.७), ब्रह्मपुरी (४५.९-२७.४), गडचिरोली (४४-२४), गोंदिया (४२.६-२४.४), नागपूर (४४.४-२३.८), वर्धा (४४-२५.४), यवतमाळ (४४.४-२४)