वयोवृद्धाचे घरच बळकावले अशाच्या खोट्या प्रचारास सुजाण सभासदांनी बळी पडू नये; श्री रामेश्वर पॅनेलचे आवाहन

0

पुणे शहरासह जिल्ह्यात ३२ वर्षांपासून अग्रणी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या नांदेड जेपीनगर येथील श्रीरामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात जाणीवपूर्वक काहीजण खोटा प्रचार करत आहेत त्याला सभासदांनी बळी पडू नये, असे आवाहन श्रीरामेश्वर पॅनेलने केले आहे. पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकी येत्या रविवारी २७ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीत श्रीरामेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. त्या वेळी बोलताना पतसंस्थेचे संस्थापक, माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब हगवणे यांनी विरोधकांवर सडेतोड टीका केली.

बाळासाहेब हगवणे म्हणाले, सिंहगड-हवेलीसह जिल्ह्यातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्थेने मोठे योगदान दिले आहे. असे असताना पतसंस्थेला बदनाम करण्याचे षड्यंत्र काही विरोधकांनी रचले आहेत. पतसंस्थेच्या वतीने विरोधकांना वेळोवेळी भरीव आर्थिक मदत दिली आहे. मात्र, पतसंस्थेची उन्नती पाहवत नसल्याने – आकसापोटी बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. एका वयोवृद्ध व्यक्तीने विनामोबदला राहण्यासाठी घर दिले असता त्यांचे घरही विरोधकाने बेकायदा बळकावले आहे, असे सांगून अशा उपद्रवी विरोधकांना त्यांची जागा सुजाण सभासदांनी दाखवावी.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

या वेळी उपस्थित सभासदांनी एका स्वार्थी व्यक्तीमुळे प्रथमच पतसंस्थेची निवडणूक होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. तसेच विरोधकांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार केला. पॅनेलचे चिन्ह असलेल्या कपबशींच्या भव्य प्रतिकृती हातात घेऊन उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. या वेळी पॅनेलचे सर्वसाधारण जागेचे उमेदवार सचिन दशरथ दांगट, विकास पंढरीनाथ दांगट, अभिजित सोपान घुले, बाळासाहेब काळुराम घुले, बाळासाहेब अर्जुनराव हगवणे, राजेंद्र गणपत हगवणे, देवीदास एकनाथ लगड, विलास साधू मते, विशेष मागास राखीव प्रवर्गातील राजेश शंकर देवकर आदीं उपस्थित होते.