लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन, त्रिशा कृष्णन आणि सिलंबरासन टी. आर. उर्फ सिम्बू हे त्यांचा आगामी चित्रपट ‘ठग लाइफ’ ला घेऊन चर्चेत आहे. या चित्रपटाचं ते प्रमोशन करत आहेत. अशात एका मुलाखतीत सुत्रसंचालकानं सगळ्यांना लग्नाविषयी त्यांना काय वाटतं याविषयी विचारलं. त्रिशानं उत्तर दिलं की माझा लग्नावर विश्वास आहे. जर लग्न झालं तर ठीक आहे, जर नाही झाली तरी ठीक आहे. तर हाच प्रश्न कमल हासन यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी एमपी जॉन ब्रिटास यांच्यासोबत झालेल्या घटनेचा उल्लेख केला.






कमल हासन यावेळी म्हणाले की, “ही 10-15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक चांगला मित्र आहे, खासदार जॉन ब्रिटास. त्यानं एकदा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर मला विचारलं, ‘तू एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबातून आला आहेस, तरी तू दोनदा लग्न कसं केलंस? मी म्हणालो, चांगल्या कुटुंबातून असणं आणि लग्नाचा काय संबंध आहे? त्यानं सांगितलं की नाही, पण तू प्रभू रामची पूजा करतोस. त्यामुळे त्यांच्या मार्गावरच चालायला हवं. त्यावर उत्तर देत मी म्हणालो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कोणत्याही देवाची पूजा करत नाही. मी रामाच्या वाटेवर नाही चाललो, कदाचित त्याच्या वडिलांच्या म्हणजे राजा दशरथ यांच्या मार्गावर चाललो असेन.
कमल हासन यांची दोन लग्न
1978 मध्ये कमल हासन यांनी डान्सर वाणी यांच्याशी लग्न केलं. तर 1988 मध्ये ते दोघं विभक्त झाले आणि त्याचवर्षी कमल हासन यांनी अभिनेत्री सारिकासोबत दुसरं लग्न केलं. पण त्याआधी पासून अर्थात 1986 पासून कमल हासन आणि सारिका हे लिव्हिन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्याचवर्षी त्यांची मोठी मुलगी आणि अभिनेत्री श्रूती हासनचा जन्म झाला आणि तिच्या जन्माच्या दोन वर्षानंतर कमल हासन आणि सारिका यांनी लग्न केलं. तर 1991 मध्ये त्यांची दुसरी मुलगी अक्षरा हासनचा जन्म झाला. लग्नाच्या काही वर्षांनंतर कमल हासन आणि सारिका या दोघांचा देखील घटस्फोट झाला. त्यांनी 2002 मध्ये घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दिला होता तर 2004 मध्ये त्यांच्या घटस्फोटाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर 2005 पासून 2016 पर्यंत कमल हासन हे गौतमीसोबत रिलेशनशिपमध्ये होते.










