पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा देखील दिला आहे. मात्र, आता पुणे पोलिसांनी या डॉक्टरला पोलीस प्रोटेक्शन दिले असल्याचे समोर आले आहे.






तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप करण्यात आले आहेत, याप्रकरणी वेगवेगळ्या स्तरावर चार चौकशी समिती नेमल्या गेल्या. तीन समितांनी आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला असून बुधवारी येणाऱ्या ससून रुग्णालयाच्या समितीच्या अहवालानंतर आता या प्रकरणाच्या कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.
पुण्यात तनिषा भिसे या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला, भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यामुळे या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले होते, आत्तापर्यंत या प्रकरणात वेगवेगळ्या स्तरावर चार समित्यांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून रुग्णालय प्रशासनालाही जबाबदार धरले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
तनिषा भिसे यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज असताना 10 लाख रुपयांची मागणी डॉ. सुश्रुत घैसास यांनी केल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे. त्यासोबतच 10 लाखांची पूर्तता न केल्यानेच डॉ. घैसास यांनी उपचार केले नाही, असे भिसे कुटुंबाचे म्हणणे आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन दिला असल्याचे समोर आले आहे. यापुढे डॉ. घैसास यांच्या सोबत सातत्याने पुणे पोलिसांचा एक कर्मचारी असणार आहे. त्यासोबतच घैसास यांना रोज पुण्यातील अलंकार पोलीस चौकी येथे हजेरी लावण्याचा सूचना देखील पोलिसांकडून देण्यात आल्याचे समोर आले आहे. घैसास हे कुठेही पळून जाऊ नये या दृष्टिकोनातून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत डॉ. घैसास यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस प्रोटेक्शनची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.











