नवी दिल्ली: लोकसभेत मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. जवळपास 12 तासांहून अधिक वेळ चर्चा करण्यात आली. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेत आणखी एक प्रस्ताव मांडण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा प्रस्ताव मांडला. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. अमित शाह यांच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी शाह यांच कौतुक केले.






अमित शाह यांनी काय म्हटले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास लोकसभेत प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीबाबत होता. अमित शाह यांनी प्रस्ताव मांडताना म्हटले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार भडकला. या दंगली नाहीत किंवा हा दहशतवाद नाही. उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा अर्थ लावण्यावरून दोन समुदायामध्ये जातीय हिंसा झाली. सर्वांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. मणिपुरात गेल्या चार महिन्यांपासून हिंसाचार झालेला नाही पण परिस्थिती समाधानकारक आहे असे मी म्हणणार नाही, पण ती नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार सर्व शक्य पावले उचलत असल्याचे त्यांनी म्हटले.
शाह यांनी म्हटले की, मणिपूरमध्ये 1993 साली कुकी-नागा यांच्यात जातीय संघर्ष झाला. हा संघर्ष पाच वर्षे सुरू राहिला. पुढे एक दशक छोट्या मोठ्या घटना सुरू होत्या. या हिंसाचाराचा संबंध राजकीय पक्षासोबत जोडता कामा नये असेही त्यांनी म्हटले.
सुप्रिया सुळेंकडून शाहांचे कौतुक…
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आम्हाला गृहमंत्र्यांकडून जास्त अपेक्षा आहेत. अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहे. त्यांनी काश्मीरमध्ये सुपीरिअर रिझल्ट्स दिले. पण, मणिपूरवर समाधान नाही. सरकार एक देश एक निवडणुकीवर चर्चा करत आहे. पण राष्ट्रपती राजवट लावावी लागते हे सशक्त लोकशाहीसाठी चांगले नसल्याचे त्यांनी म्हटले. शाह प्रयत्न करून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करतील असेही सुळे यांनी म्हटले.
शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी शाह यांच्या प्रस्तावाला विरोध करताना म्हटले की, आम्ही मणिपूरला गेलो, तेव्हा गोगोई आमच्या सोबत होते. तेव्हा महिला राज्यपालांनी हतबलता व्यक्त केली होती. पंतप्रधानांनी मणिपूरला भेट देणे आवश्यक होते, असेही सावंत यांनी म्हटले.











