इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये काढल्या प्रकरणी प्रशांक कोरटकर हा सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस कोठडीमध्ये कोरटकरची चौकशी करण्यात आली. मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी चौकशी करण्यात आली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच फोनवर माज दाखवणारा कोरटकर पोपटासारखा बोलू लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इंद्रजीत सावंत यांनी तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर पसार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलीस हे नागपूर येथील त्याच्या घरी दाखल झाल्यानंतर कोरटकर घरी नसल्याचे आढळले. जवळपास महिनाभर प्रशांत कोरटकरचा शोध सुरू होता. अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून त्याला अटक केली. कोल्हापूर जिल्हा कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली.
चौकशीत काय म्हणाला कोरटकर?
प्रशांत कोरटकर याने पोलीस चौकशीत आपला कबुलीजबाब दिला आहे. इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली त्याने दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय, आपल्या मोबाईलमधील सगळा डेटा मीच उडवल्याची कबुली देखील कोरटकरने दिली असल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणामध्ये कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. कोरटकर हा हैद्राबाद मार्गे चेन्नईमध्ये पळून जाण्याचा तयारीत असल्याचीही माहिती चौकशीत समोर आली.
इंद्रजीत सावंत यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशांत कोरटकरने आपल्या विरोधात हा कट असल्याचा दावा केला होता. आपला आवाज एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आला. त्यातून फोन कॉल करण्यात आल्याचा अजब दावा कोरटकरने केला होता. मात्र, पोलीस चौकशीत कोरटकरने आपणच इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल केल्याची कबुली दिली.
फॉरेन्सिक विभागाने घेतले आवाजाचे नमुने….
फॉरेन्सिक विभागाने प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले. यावेळी इंद्रजित सावंत यांच्या सोबत झालेला संवाद लिहून काढत कोरटकरकडून वाचून घेण्यात आला.