लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटानंतर राज्यभरात सध्या औरंगजेब हा चर्चेचा विषय ठरला आहे. याच चर्चेदरम्यान माजी आमदार आणि एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी अभिनेता अक्षय खन्नाची भेट घेतली. अक्षय खन्नाने ‘छावा’मध्ये क्रूर औरंगजेबाची भूमिका साकारली होती. या भेटीनंतर वारिस पठाण यांनी अक्षयसोबतचे फोटो एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केले. त्याचसोबतच त्यांनी एक सूचक ओळ लिहिली आहे. ‘छावा चित्रपटात जर ही भूमिका एखाद्या मुस्लीम अभिनेत्याने साकारली असती तर आतापर्यंत कायच्या काय झालं असतं’, असं त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे वारिस यांच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.
वारिस पठाण यांची पोस्ट-
अक्षयसोबतचे फोटो पोस्ट करत वारिस यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलं, ‘छावा चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारलेला अभिनेता अक्षय खन्ना याची आज भेट घेतली. चांगली व्यक्ती आहे. छावा चित्रपटात जर ही भूमिका एखाद्या मुस्लीम अभिनेत्याने साकारली असती तर आतापर्यंत कायच्या काय झालं असतं.’
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दोन गटांत संघर्ष
औरंगजेबाच्या कबरीवरून आंदोलन झाल्यानंतर दोन गटांमध्ये संघर्ष उडाल्यामुळे नागपुरात सोमवारी तणाव निर्माण झाला. दोन्ही गटातील युवकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस जखमी झाले. हुल्लडबाजांनी रस्त्यावर जाळपोळही केली. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी सोमवारी नागपुरात मोर्चा निघाला होता. त्यानंतर रात्री या मोर्चाला हिंसक वळण लागलं. या राड्यानंतर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छावा’चा उल्लेख केला होता. “छावा या चित्रपटामुळे राज्यात लोकांच्या भावना मोठ्या प्रमाणावर प्रज्वलित झाल्या आहेत. मला कुठल्याही चित्रपटावर टीका करायची नाहीये. परंतु औरंगजेबाबद्दलचा राग मोठ्या प्रमाणावर बाहेर येतोय”, असं ते म्हणाले.
छावा या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. याशिवाय चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. चित्रपटाने जगभरात कमाईचा 700 कोटींचा टप्पा पार केला आहे.