राज्यभरातून दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या साक्षीने आज श्रीक्षेत्र देहूत सथ तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठगमन सोहळा पार पडला. गोपाळपूरा येथील वैकुंठगमन मंदिराच्या आवारात दुपारी सव्वा बारा वाजता राज्याच्या कानाकोपर्यातून आलेले लाखो भाविक भक्त,भाविकांनी मनोभावे अभिवादन करीत नांदुरकीच्या वृक्षावर बुक्का,तुळशी -पानफुले उधळण करीत हा सोहळा पहायला मिळाल्याने जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त करीत माघारी फिरले.






जगद्गुरू श्री संत तुकोबारायांची जन्म,कर्म,योग भूमी असलेल्या देहूनगरीत गत आठवडाभर दिंड्या,भाविक वारकरी दाखल होत होते.परिसरामध्ये ठिकठिकाणी अखंड हरिनाम,भजन, कीर्तन ,गाथा पारायण, सप्ताह सुरू असल्याने भक्तिमय वातावरण झाले होते. दिंड्याच्या फडावर शनिवारी रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापुजा, हरिपाठ आणि वीणा- टाळ – मृदंगाच्या गजरात भजन किर्तन व हरिनामाच्या जयघोष सुरू होता. राज्याच्या कानाकोपर्यातून बीज सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी रविवारी (दि.16) पहाटे पासूनच पांडूरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात आणि गोपाळपूरा येथील वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. वैंकुठगमन मंदिराच्या परिसरात जागा मिळेल तेथून हा सोहळा दृष्टीस पडेल अशा ठिकाणी बसण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात व बीज सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमाला पहाटे तीन वाजल्यापासून काकड आरतीने सुरुवात झाली. श्रीं ची आरती, श्री विठ्ठल रुखमाई, शिळा मंदिर,पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची महापूजा, वैकुंठगमन मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे,संतोष महाराज मोरे,अजित महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे ,वंशज यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. संस्थानच्या वतीने मंदिराच्या गाभार्यात, भजनी मंडपात, मुख्य मंदिर परिसरात प्रवेशद्वारात आणि गोपाळपूरा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि नांदुरकीच्या झाडाखालील पारावर फुलांची आकर्षक सजावट तर रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
वारकरी भाविक भक्तांच्या दर्शनार्थ मंदिर 24 तास सुरू ठेवण्यात आल्यामुळे पहाटेच्या नैमित्तिक महापूजे नंतर भाविकांना मुख्य मंदिरात,शिळामंदिर व वैकुंठगमण मंदिरात दर्शनाला सोडण्यात आले. सकाळी मंदिरातील सर्व विधीवत पूजा उरकल्यानंतर सकाळी पावणे अकराच्या सुमारास पालखीचे मानकर्यांनी चोपदार नामदेव गिराम यांच्या सुचनेनंतर पालखी खांद्यावर घेत पुंडलिका वरदा हरि विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकर्यांसह शिंगाडे, सनई चौघडा व ताशाच्या गजरात पालखी मुख्य मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडताच पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी पुढे परंपरेप्रमाणे संबळ, गोंधळी, चौघडा, शिंगवाले, ताशा, अब्दागिरी, गरूड टक्के, पताका तर जरीपटका वाले सहभागी झाले होते. पालखी पुढे मानकरी दिंडीसह मोठ्या लवाजम्यासह पालखीचे मुख्यमंदिरातून वैकुठगमण मंदिराकडे प्रस्थान झाले.
पालखी बाराच्या सुमारास वैंकुठगमन मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालुन येथील नांदुरकीच्या वृक्षाखाली आली. येथे देहूकर महाराज यांचे सकाळी दहाच्या सुमारास परंपरे प्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या वैंकुठगमण प्रसंगावरील घोटवीन लाळ, ब्रम्हज्ञानी हाती । मुक्त आत्मस्थिती सोडविन ॥ या अभंगावर किर्तन सुरू होते.
कीर्तनातून त्यांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या महानिर्वाण प्रसंगाचे निरूपन करताना म्हणाले, संत आणि देव यांच्या अवतार घेण्याचे प्रयोजन, संत येतात कोठून, कशासाठी येतात, कोठे येतात व काय कार्य करतात याचे विवेचन केले. किर्तन व हरिनामाने शरीर सुद्दा ब्रम्हरूप होते. अशा अनेक विषयांवर किर्तनातून विचार प्रकट करीत श्री संत तुकाराम महारांजानी हरिनाम संकिर्तनाच्या माध्यमातून व योग साधनेच्या सहाय्याने त्यांनी आपली काया ब्रम्हरूप कशी केली हे सांगितले. कीर्तन संपल्यावर दुपारी सव्वाबारा वाजता बोला पुंडलिका वरदा हरि विठ्ठल, असा हरिनामाचा व श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी येथील नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली. हरिनामाचा गजर झाल्या बरोबर उपस्थित भाविकांनी आपले दोन्ही हात जोडून दृष्टीसमोर महाराजांचे सदेह वैकुठगमण प्रंसगाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.
प्रयाणकाळी देवे विमान पाठविले ।कलीच्या काळामाजी अद्भूत वर्तवले ख मानव देह घेऊनी निज धामा गेले । निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥या अभंगाचे गायन करीत उपस्थित लाखो भाविकांनी श्री संत तुकाराम महाराजांना मनोभावे अभिवादन केले. येथील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे परतली आणि त्याच वेळी उपस्थित भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. बीजोत्सोव सोहळा पार पडल्यानंतर येथील मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पालखी मुख्य मंदिरात प्रवेश करताना नगरखान्यातून पालखीवर पुष्पवृष्टी केली. हा सोहळा दुपारी दिडच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा घालुन संपन्न झाला. देवस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात प्रथेप्रमाणे उपस्थित दिंडीकरी, फडकरी, मानकरी यांना मानाचे फेटे व नारळ प्रसाद देवून सन्मानित करण्यात आले. मुख्य मंदिरात दर्शनबारी मंडपातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते.
दरम्यान, वैकुंठगमन मंदिरामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे, सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके, उपजिल्हाधिकारी यशवंत माने त्यांच्या पत्नी देवशाला माने, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार मनीषा माने, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निविदा घार्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शैला खंडागळे, पंचायत समितीचे माजी सभापती हेमलता काळोखे, नगराध्यक्ष पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, नगरसेवक योगेश काळोखे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम, माजी सरपंच रत्नमाला करंडे, माजी उपसरपंच स्वप्निल काळोखे , मंडलाधिकारी दिनेश नरवडे, संजय सैद, वैभव गुतेकर, तलाठी सूर्यकांत काळे, अशोक अमोदे, महसूल सेवक संभाजी मुसुडगे, पोलीस पाटील सुभाष चव्हाण, चंद्रसेन टिळेकर, ग्रामस्थ, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे आजी – माजी अध्यक्ष, विश्वस्त, महसूल विभागाचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
पालखी वैंकुठगमन मंदिरामधुन पुन्हा देऊळवाड्यात आल्यानंतर देऊळवाड्यात पालखी विसावली. सायंकाळी मुख्यमंदिरात किर्तन झाले. वाहतूक विभागाच्या वतीने पहाटेपासूनच देहू हद्दीत सर्वच वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.भाविकांची गर्दी माघारी फिरताना लघु उद्योजक आणि विविध व्यवसायिक, स्टॉल, खेळणी, अमृततुल्म, आईसक्रीम, पाणीपुरी, भेळ विक्रते, पथारीवाल्यांनी दुकाने थाटली होती.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीश्रीक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थानच्या वतीने तीर्थक्षेत्र देहूतील मुख्यमंदीर, वैकुंठगमन मंदिर, गाथा मंदिर, संत तुकोबारायांचे ध्यान ठिकाण असणारे भामचंद्र डोंगर, घोरावडेश्वर डोंगर आणि भंडारा डोंगर या ठिकाणी हेलिकॉप्टरने तीन फेर्या पूर्ण करीत पुष्पवृष्टी करण्यात आली.











