पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हे आरोप केले असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील तसेच अंजली दमानिया यांनी गोरेंवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत आहे. याच सर्व आरोपांच्या, घटनांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली.






विरोधकांनी केलेल्या या आरोपांचे गोरे यांनी खंडन केले आहे. 2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्त केलं होतं, ते प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचे ते म्हणाले. वडिलाच्या निधनानंतर अस्थिविसर्जनही करू दिलं नाही, विरोधकांनी खालच्या पातळीचं राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आहे, असं जयकुमार गोरे म्हणाले.
काय म्हणाले जयकुमार गोरे ?
2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. 2017 साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. आणि त्यावर ट्रायल होऊन 2019 साली त्याचा निकाल लागला. त्याच निकालाची प्रत माझ्यासोबत आहे, त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे. जप्त केलेला मुद्देमाल, मोबाईल हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याचवेळी दिला होता. आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार करत विरोधकांनी सहा वर्षांपूर्वीचं हे प्रकरण पुन्हा उकरून काढलं, असं ते म्हणाले.
विरोधकांनी एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण करू नये
या देशात लोकशाही आहे, आपल्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाला ( 2019) आता सहा वर्ष झाली आहेत. आज सहा वर्षांनंतर हा विषय पुन्हा समोर आला आहे. आपण कुठल्या वेळी कोणता विषय समोर आणावा, याबद्दल राजकीय नेत्यांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असं मला वाटत. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाला, ज्या वडिलांनी कष्ट करून मोठं केलं, इथपर्यंत पोहोचवलं, त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांचं अस्थिविसर्जन सुद्धा करू दिलं नाही. एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करू नये, असं गोरे म्हणाले.
त्यांना कोर्टात खेचणार
या घटनेचा कोर्टाने निकाल दिलेला आहे, पण या संदर्भात ज्यांनी ज्यांनी आरोप केला आहे, त्या प्रत्येकावर मी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे गोरे यांनी नमूद केलं. त्या लोकांविरोधात बदनामीच खटला दाखल करून त्यांना कोर्टात खेचणार असल्याचं गोरे यांनी त्यांनी सांगितलं.
काय आहेत आरोप ?
भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेल्या फोटा पाठवल्याच्या प्रकरणावरुन गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्या महिलेला अद्याप त्रास देत असल्याचा आरोपही गोरेंवर केला जात आहे. मी त्या महिलेला त्रास देतोय की नाही या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी. जो कोण दोषी असेल , जे खोटं कुंभाड रचताहेत, या खोट्या भानगडी करत त्यांच्यावर कारवाई करावी असं आव्हान त्यांनी दिलं.











