निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असले तरी सत्ता वाटपाच्या मुद्यावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या सरकारमध्ये खाते वाटपानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर चौकशी सुरू झाली आहे. तर, काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. या सगळ्यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे म्हटले जात होते. आता अधिवेशनात आता त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.






सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष हा धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, राज्यातील शेती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरही विरोधक आक्रमक होणार आहेत. अशातच या विधीमंडळ अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे हे विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून पूर्णपणे अलिप्त राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे यांच्याकडील खात्याची जबाबदारी इतरांकडे…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनाच्या कामकाजापासून अलिप्त राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजातून अलिप्त राहणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील तिन्ही खात्या संदर्भातील विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची जबाबदारी शिवसेनेच्या इतर मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास खात्या संदर्भातील प्रश्नांची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सार्वजनिक उपक्रम एमएसआरडीसीच्या संदर्भातील उत्तरांची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी ही पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे असणार आहे.
महायुतीत कुरघोडी नाट्य?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मागील सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या काही निर्णयांवर चौकशी लावण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्याचे निर्णय संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही निर्णय हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून समांतर सरकार चालवले जात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे महायुतीमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे, असे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे, आमच्यात कसलही कोल्डवॉर नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र तरीही अधिवेशन कामकाजातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलिप्ताच्या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.











