पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११९ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात वेगाने वाढणाऱ्या आरोग्याशी संबंधित समस्येवर भाष्य केले आहे. पंतप्रधान म्हणाले, ‘डेहराडून येथे राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनादरम्यान मी एक अतिशय महत्त्वाचा विषय उपस्थित केला ज्यामुळे देशात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. विषय म्हणजे लठ्ठपणाची झपाट्याने वाढणारी समस्या आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. आपण एकत्रितपणे छोट्या प्रयत्नांनी या आव्हानाचा सामना करू शकतो. यासाठी पहिले पाऊल म्हणजे तुम्ही दरमहा १० टक्के कमी तेल वापरण्याचा निर्णय घ्या. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तेल खरेदी करताना पूर्वीपेक्षा १० टक्के कमी तेल खरेदी करणे. लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल.
पंतप्रधान म्हणाले, एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागेल. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दर आठ व्यक्तींपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहे. शिवाय, गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाच्या घटना दुप्पट झाल्या आहेत. त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या चौपट वाढली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)म्हटले आहे की २०२२ मध्ये जगभरात सुमारे २.५ अब्ज लोक जास्त वजनाच्या समस्येने ग्रस्त होते. हे आकडे खूप गंभीर आहेत, ज्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होऊ शकते.ते म्हणाले की तेल हे लठ्ठपणाचे सर्वात मोठे कारण आहे. म्हणून, सर्वप्रथम, दर महिन्याला तुमच्या जेवणातील तेलाचे प्रमाण १० टक्के कमी करा. जर तुम्ही हळूहळू या गोष्टी कमी केल्या तर तुमचे वजन कमी होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लठ्ठपणा वाढवणाऱ्या पदार्थांचा वापर जेवणात करू नका. शुद्ध सात्विक गोष्टींचे सेवन करा. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही अनेकदा लठ्ठपणा कमी करण्यास सांगितले आहे. पण लठ्ठपणा कसा कमी करायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर अनेक तज्ज्ञांनी उपाय सांगितले आहेत.