महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. खातेवाटपही आता पुर्ण झाले आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आता पुढच्या कामला लागले आहेत. त्यांनी नुकताच कार्यकर्त्यांचा मेळाव्याला संबोधित करताना आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचले. शिवाय त्यांना आता निवडणुकांच्या तयारीला लागा असा आदेश दिला आहे. लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत त्यांनी या माध्यमातून दिले आहेत.






मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे हसत खेळत कान टोचले आहेत. पक्ष सदस्यता नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात अधिवेशनाच्या सहा दिवसांत जे भेटायला आले त्यांच्यापैकी 95 टक्के लोकांना केवळ फोटो काढायचे होते असं सांगितलं. त्यामुळे आता संघटनेकडे लक्ष द्या. येत्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगत त्यांना सतर्क केले आहे. पदाधिकारी आणि नेते यांना पक्ष सदस्यता नोंदणी अभियानाच्या कामात सक्रिय होण्यास सांगितले आहे.
येत्या 12 जानेवारीला भाजप शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग फुकणार असल्याचं ही त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राज्यात दीड कोटी नवे सदस्य नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले आहे. येत्या पाच जानेवारीला यातील पन्नास लाख सदस्यांचा टप्पा गाठायचा आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी आधी कार्यक्रम दिला आहे. त्यासाठी आता मैदानात उतरा असा सल्लाही त्यांनी दिला.
गेल्या अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी नगरसेवकां ऐवजी प्रशासक कारभार पहात आहेत. अशा वेळी या निवडणुका लवकर झाल्यापाहीजे अशी कार्यकर्त्यांचीही मागणी आहे. त्यामुळे रखडलेल्या या निवडणूका येत्या मार्च एप्रिल महिन्यात होण्याचे संकेतही या माध्यमातून फडणवीसांनी दिले आहेत.
ठराविक कार्यकर्त्यांचे ठराविक जिल्हेच सदस्य नोंदणीमध्ये पुढे राहातात. असे यावेळी होऊ नये असं आवर्जून फडणवीसांनी सांगितलं. सर्वांनी कामाला लागा असा आदेशही त्यांनी यावेळी दिला. फक्त कामाला लागायचे सांगून होणार नाही, तर प्रत्यक्षात प्रत्येकाने सदस्य नोंदीचे काम प्रामाणिक पणे केले पाहीजे. भाजप मोठा पक्ष आहे. पदाधिकारी असो की लोकप्रतिनिधी असो सर्वांनी जवाबदारीने वागा. लोकप्रतिनिधीचा सन्मान ठेवा असा सल्लाही यानिमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.











