क्रिकेटमध्ये एका चुकीमुळे सामना जिंकताही येतो आणि एका चुकीमुळे सामना हातून निसटूनही जातो. असंच काहीसं दृश्य भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाले आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पहिल्या डावात गोलंदाजी करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. मात्र हार्दिक पंड्या आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मामुळे भारताला १५४ धावांचा फाईन बसला. यासह मोठा रेकॉर्डही मोडला गेला.






बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघातील अनुभवी खेळाडू हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा यांनी आपल्या क्षेत्ररक्षणाने निराश केलं. भारतीय संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या हर्षित राणा आणि मोहम्मद शमीने संघाला शानदार सुरुवात करुन दिली.
दोघांनी सुरुवातीच्या ८ षटकात मिळून ३ गडी बाद केले. इथपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. त्यानंतर अक्षर पटेलने आणखी २ गडी बाद करुन बांगलादेशचं टेन्शन आणखी वाढवलं. अवघ्या ३५ धावांवर बांगलादेशचा निम्मा संघ माघारी परतला होता.
रोहित आणि हार्दिकची चूक भारतीय संघाला भोवली
बांगलादेशला सुरुवातीला ५ धक्के बसल्यानंतर भारतीय संघाकडे बांगलादेशचा डाव लवकरात लवकर गुंडाळण्याची संधी होती. अक्षर पटेलने एकाच षटकात २ गडी बाद केले. त्यानंतर त्याला हॅट्रीक घेण्याची संधी होती. मात्र रोहितने सोपा झेल सोडल्यामुळे अक्षरची हॅट्रीक हुकली. त्यानंतर जाकीर आणि हृदोयने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला.
एकट्या रोहितने नव्हे, तर हार्दिकची चूकही भारतीय संघाला महागात पडली. पहिल्या डावातील २० वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला होता. या षटकातही विकेट घेण्याची संधी मिळाली होती.
मात्र हार्दिकने सोपा झेल सोडला आणि पुन्हा एकदा बांगलादेशी फलंदाजाला जिवदान मिळालं. ज्यावेळी हार्दिकने हा झेल सोडला त्यावेळी तौहीद अवघ्या २३ धावांवर फलंदाजी करत होता. तर बांगलादेशची धावसंख्या ७८ धावा इतकाच होता.
या दोघांनी मिळून १५४ धावांची भागीदारी केली. यासह दोघांनी १९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. ही चॅम्पियन्स ट्रॉफीतील सहाव्या विकेटसाठी केली गेलेली सर्वात मोठी भागीदारी आहे. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचर आणि जस्टीन कँपच्या १३१ धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.











