आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे. स्पर्धेची घोषणा झाली तेव्हापासूनच अनेक वाद सुरु होते. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर भारतीय ध्वज नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता यात सुधारणा झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या ताज्या फोटोमध्ये दिसून येत आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सहभागी होणाऱ्या इतर देशांसोबत भारताचा ध्वजही लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा ध्वज दिसत नव्हता तेव्हा मोठा वाद झाला होता, पण आता सर्व काही सुरळीत दिसत आहे.
नक्की काय झालं होतं?
कराचीतील नॅशनल स्टेडियमवर भारतीय ध्वज नसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या इतर देशांचे झेंडे तिथे दिसत होते, पण भारतीय ध्वज तिथून गायब होता. यामुळे सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. याशिवाय भारतीय चाहते यावरून चांगलेच संतापलेले होते.
काय म्हणाले पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड?
पाकिस्तानने आपल्या स्टेडियममध्ये भारतीय ध्वज फडकावण्यास नकार दिल्यावर चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. हे प्रकरण तापल्यावर पीसीबीने आता प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने (PBC) यावर उत्तर देत सांगितले की, ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी केवळ पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्याच देशांचे झेंडे स्टेडियममध्ये फडकवले गेले आहेत.’
राजीव शुक्ला यांनी आक्षेप घेतला होता
बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनीही या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, पाकिस्तानी बोर्डाने प्रथम भारतीय ध्वज तेथे होता की नाही याची खात्री करावी. ती नसेल तर ती बसवायला हवी होती. राजीव शुक्ला यांनी मंगळवारी दिल्लीतील रेस्टॉरंट क्रिकेट लीगच्या प्रसंगी लाइव्हमिंटला सांगितले, “प्रथम, भारतीय ध्वज तेथे आहे की नाही याची पुष्टी केली पाहिजे. नसल्यास, तो लावायला हवा होता. सर्व सहभागी देशांचे ध्वज तेथे असायला हवे होते.”