हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करून काँग्रेसने पक्षातील अनेक दिग्गजांना धक्का दिला आहे. युवा नेत्याला संधी देण्यात येणार असे बोलले जात होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात वेगळेच नाव जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हीच संधी साधत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना खोचक टोला लगावला आहे.






विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे पहिल्या फळीतील दहा नेते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत होते. आपलीच सत्ता येणार आणि मुख्यमंत्री होणार या थाटात ते वावरत होते. मात्र,विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे यांपैकी एकानेही प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली नाही. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसवर ओढावली असल्याचे टीका त्यांनी केली.
प्रदेशाध्यक्ष कोणाला करायचे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मात्र काँग्रेसच्या दाहा मुख्य नेत्यांनी अध्यक्षपद स्वीकारले नाही हे दुर्भाग्यपूर्ण आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारायला कोणी तयार नाही, त्यमुळे कोणाल तरी बकरा करण्यासाठी नाव शोधत असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने मला सांगितले होते असा दावाही यावेळी बावनकुळे यांनी केला.
काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला मुख्यमंत्री व्हायचे होते. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून खाजगीत खातेवाटपसुद्धा केले होते, याकडे लक्ष वेधून त्यांनी कोणाचेही नाव न घेता माजी प्रदेशाध्यक्षांवर निशाणा साधला. महाराष्ट्राचे नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणी तयार नाही इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. यापुढे काँग्रेसला गळती लागल्याचेही दिसेल असे सूचक वक्तव्यसुद्धा बावनकुळे यांनी केले.
…म्हणून साळवी यांचा शिंदेसेनेत प्रवेश
महाविकास आघाडी ही अविचारी होती. त्यांचा अजेंडा विकासाचा कधीही नव्हता. केवळ सत्तेसाठी व मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे सेनेने अभद्र युती केली होती. त्यामुळे ठाकरे यांच्याकडे असलेले नेते आता शिंदे यांच्याकडे जात आहे. ठाकरे गटाने हिंदुत्वाचा विचार सोडल्यामुळे लोक शिंदेसेनेकडे जात असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीवर बावनकुळे यांनी काँग्रेसचा एकही बडा नेता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता, एवढी दुर्दशा काँग्रेसची झाली असल्याची टीका केली होती. त्यावर सत्ता मिळाली की, अनेकांच्या डोक्यात हवा जाते. त्यांचा लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो असं प्रत्युत्तर काँग्रेसचे नवनियुक्त विधानसभेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही तसेच झाले आहे. ते दुसऱ्याला कमी लेखत आहेत. मात्र, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आले नाही असे सांगून काँग्रेसचे नवनियुक्त विधानसभेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला यापेक्षा चांगले दिवस येतील, अशी आशा व्यक्त केली.











