शरद पवार ’24×7′ चालणारे राजकीय विद्यापीठ निवृत्तीच्या चर्चेने ‘कही खुशी कही गम’!; कोल्हापुरात खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे संकेत

0

कोल्हापुरात खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत वक्तव्य केले. खुद्द पवारही याबाबत अनेकवेळा बोलले आहेत. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुकीच्या राजकारणातून निवृतीचे संकेत त्यांनी दिले.सहा दशकांहून अधिक काळ राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात व समाजकारणात केंद्रस्थानी राहून अनेक नेत्यांच्या राजकारणाचा ‘उदयास्त’ करण्याचे काम पवार यांनी केले आहे.

शरद पवार हे ‘ट्वेंटी फोर बाय सेव्हन’ चालणारे राजकीय विद्यापीठ आहे. जसे ते राजकारणात रमतात तसेच ते साहित्य, संस्कृती, क्रीडा, शेती, माती, पाणी, उद्योग यातही रमतात. पवारांच्या राजकीय, वैचारिक, सामाजिक भूमिकेबाबत मतभेद असणे आणि तो त्या- त्या वेळी व्यक्त होणे, हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, जडणघडणीला धरून आहे. मात्र राजकारणापलिकडचे पवार हे अभ्यासण्यासारखे आहेत.

शेती, सहकार, उद्योग, साहित्य, कला या क्षेत्रातील त्यांची सुरू असणारी अखंड मुशाफिरी, सतत भटकंती, लोकांना समजून घेणे, नवीन काय करता येईल याचा ध्यास घेऊन त्यासाठी पाठपुरावा करणे, ज्या त्या भागात गेले की राजकारणापलीकडे जाऊन तेथील शेती, पाणी, उद्योगाची माहिती घेणे, त्या – त्या क्षेत्रातील लोकांना आवर्जून भेटणे आणि तो परिसर समजून घेऊन आपल्यापरीने त्याच्या विकासासाठी काही योगदान देता येईल का, यावर त्यांचा भर राहतो. याउलट मनाजोगते मंत्रिपद किंवा पालकमंत्रीपद मिळाले नाही म्हणून दिलेल्या जिल्ह्याची जबाबदारी व्यवस्थित पार न पाडणारे मंत्रीही पहावयास मिळत आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

शरद पवारांचे सुसंवादाचे कौशल्य वादातीत –

राजकारणात सर्वांनाच केंद्रस्थानी राहण्याचे भाग्य लाभत नाही. त्यासाठी अपार कष्ट, राजकीय हवेचा पुरेपूर अंदाज घ्यावा लागतो. रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करावी कागते. अर्थात घरावर तुळशीपत्र ठेवून काम करावे लागते. त्यामुळे कौटुंबिक दुरावा देखील वाट्याला येतो. मात्र पवार यांनी कुटुंब आणि राजकारण यांचा सुरेख मेळ साधला आहे. त्यामुळेच टोकाचे राजकीय मतभेद असताना देखील अजित पवार यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर येऊनही त्यांच्या बोलण्यातून आणि हालचालीतून मतभेदाची पुसटशी जाणीव देखील उपस्थितांना होत नाही.

उलट अजित पवार यांच्याबाबतीत ती प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे काळ आणि वेळेचे भान, व्यासपीठाचा मान ठेऊन बहुरंगी, बहुढंगी, श्रमजीवी, उद्योगी, भांडवली, सत्ताधारी, विरोधी, समविचारी, परस्परविरोधी विचारधारेच्या लोकांसोबत सुसंवाद ठेवण्याचे कौशल्य पवार यांच्याकडून राजकारण्यांनी शिकणे आवश्यक आहे.

मोजके बोलण्याचे कसबही मोठे –

अलीकडे राजकारणात व्यासपीठ पाहून विचार मांडण्याची प्रथा बंद झाली आहे. व्यासपीठ कोणतेही असो, नेत्यांचा अजेंडा ठरलेला राहतो. राज्यात सर्वपक्षीय वाचाळवीरांचे तर पेव फुटले आहे. कोणीही उठायचे आणि कोणावरही बोलायचे, असा प्रकार सुरू आहे. तारतम्य नावाचा प्रकार हरवला आहे. अभ्यासपूर्ण बोलण्याचा तर दुरान्वयानेही संबंध राहिलेला नाही. कोणाला तरी खुश करण्यासाठी तोंडाचा बाजार करणारी ठराविक मंडळी सर्व पक्षात उदयास आली आहेत. तसेच समाजमाध्यमावर सतत वळवळ करणारी मंडळी देखील अनेक आहेत. मोजकेच आणि समर्पक बोलावे, सवंग लोकप्रियतेसाठी बाष्कळ बडबड करू नये हे त्यांच्या लेखीच दिसत नाही. बडबड न करता अनुल्लेखाने कसे मारावे, हे पवारांकडून शिकावे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

प्रत्येक माणसाला वय, प्रकृती आणि आजारपणामुळे मर्यादा येतात. मात्र त्याचे भांडवल करायचे नसते हे पवारांनी दाखवून दिले आहे. अन्यथा सभा, मोर्चाला हाताला सलाईन लावून, डोक्याला पट्टी बांधून येणाऱ्या चमकू नेत्यांची राज्यात काही कमी नाही. आजाराचा बाऊ न करता, उपचार आणि विश्रांती घेऊन पुन्हा कामात सक्रिय होणारे पवार राज्याने पाहिले आहेत. त्यामुळे आताही ते उपचार घेऊन राजकारणात सक्रिय होतील, यात शंका नाही. काही तरी नवीन करण्याची उमेद, उर्जा त्यांना कधी स्वस्थ बसू देत नाही. मात्र स्वस्थ असणारे नेतेही कधी पवार यांच्यासारखे राबताना दिसत नाहीत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

नेत्यांमध्ये आत्मस्तुतीचा फिव्हर –

सध्या राष्ट्रवादीसह सर्वच पक्षातील ठराविक नेत्यांना ‘आत्मस्तुतीचा फिव्हर’ आला आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात सतत ‘मी’ आढळून येत आहे. खरे तर राजकीय अनुभव आणि कर्तृत्वाने आपले नेतृत्व सिद्ध करायचे असतात. मात्र ज्यांच्याकडे कर्तृत्व नसते ते फुटकळ प्रसिद्धीचा खटाटोप करतात. पवारांना अशा गोष्टींची कधी गरज लागली नाही. त्यामुळे फुकट बडबड करणाऱ्यांनी एकदा आपल्या कर्तृत्वाचा आलेख स्वतःच तपासून पाहणे आवश्यक आहे.

राजकारण्याचं फिरणं मर्यादित झाले आहे. मंत्रालय आणि आपला मतदार संघ यापलीकडे त्यांची धाव गेलेली नाही. विरोधकांची परिस्थितीही काही वेगळी नाही. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे विरोधक देखील निवडणूक, अधिवेशन काळात सक्रिय राहतात. आजकाल सर्वपक्षीय नेत्यांचा राज्य दौरा हा प्रचारासाठीच अधिक असतो. त्यातूनही कधी अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी देखील दौरा केला जातो. मात्र या दौऱ्याचा वापर शेतकऱ्याला मदतीपेक्षा सरकारला अडचणीत आणण्यासाठीच केला जात असल्याचे दिसत आहे.