मुळशी येथील पृथ्वीराज मोहोळ हा यावर्षीच्या ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी ठरला आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब मिळविण्याचे मोहोळ कुटुंबाने पाहिलेले स्वप्न अखेर सत्यात उतरले. पण यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळाचे गालबोट लागले. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथ मारली. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळने शिवराजला चितपट केले. त्यानंतर पंचांनी मोहोळला विजयी जाहीर केले.






दरम्यान, पृथ्वीराज मोहोळने 67 वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर थेट दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यात आला. यादरम्यान तो म्हणाला की, गणपती बाप्पा मोरया! खूप भारी वाटतंय. मी कधी कोणता सामना जिंकलो तर सगळ्यात पहिल्यांदा इथेच येतो गणपतीच्या पाया पडायला. आणि आता महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन पण मी इथेच आलोय. मी यासाठी खूप तयारी केली होती, माझ्या चुलते असतील, मित्र असतील, वडील असतील अखेर यांच्या मेहनतीचे फळ भेटले.
माझ्यासोबतही गेल्यावेळी अन्याय, पण मी हार न मानता जिंकून दाखवलं
वादावर आणि पंचाच्या निर्णयावर पृथ्वीराज मोहोळने स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, तो पंचांचा निर्णय आहे, त्यावर मी काही बोलू शकत नाही. मी पण एक खेळाडू आहे. मी माझं काम करून दाखवला आहे, तो त्यांचा प्रश्न आहे ते बघतील त्यांना काय करायचं. पण पंचांचा निर्णय अंतिम असतो. माझ्यासोबत ही मागच्या वेळी असंच घडलं होतं. पण मी हार मानली नाही. यंदा आलो आणि जिंकून दाखवलं.
महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्याचे माझ्या आजोबांचे स्वप्न होते. आमच्या तीन पिढ्या या किताबासाठी खेळल्या. त्यांचे स्वप्न आज पूर्ण केल्याचे मला मोठे समाधान मिळाले. हे माझं स्वप्न नसून, हे माझ्या वडिलांचे व कुटुंबीयांचे स्वप्न होते. असे पृथ्वीराज मोहोळ म्हणाला.
महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्याचे स्वप्न मी पाहिले होते. त्यासाठी मी उपांत्य फेरीपर्यंत पोचलो होतो. माझे स्वप्न आज माझ्या मुलाने पूर्ण केले. त्याचा मला खूप आनंद आहे, असे पृथ्वीराजचे वडील राजेंद्र मोहोळ म्हणाले.











