”मला अन् माझ्या समाजाला टार्गेट केलं जातंय”, नामदेव शास्त्रींच्या भूमिकेनंतर धनंजय मुंडे आक्रमक

0
1

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देत ते गुन्हेगार नाहीत, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातंय, सामाजिक सलोखा बिघडवला जातोय, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं शास्त्री म्हणाले. नामदेव शास्त्रींनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत नामदेव शास्त्रींचे आभार मानले आहेत.

धनंजय मुंडे म्हणाले की, मंत्री झाल्यानंतर मला भगवानगडावर येण्याची इच्छा होती. मागच्या ५३ दिवसांपासून मला टार्गेट केलं जात आहे. माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. मी काल दर्शनासाठी आलो होतो. बाबांचं दर्शन झालं की शक्ती, प्रेरणा मिळते. यातूनच मला ऊर्जा मिळते. त्यामुळे आता पुढील कामासाठी मी मुंबईला निघालो आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

”महंत नामदेव शास्त्रींनी माझ्यामागे मोठी शक्ती उभी केली आहे. त्यांच्या उपकारांची परतफेड मी करु शकत नाही. बाबा जे ज्ञानेश्वरीतले अनुभव सांगतात, त्यातून मला प्रेरणा मिळते. राजकीय विषयावर आमची कसलीही चर्चा झाली नाही. बाबा कधीच राजकीय विषयावर बोलत नाहीत. ते माझ्याविषयी बोलले, हे मला कळलं. त्यामुळे त्यांच्या ऋणात आहे. संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्यामागे खंबीरपणे उभा आहे.”

मंत्री मुंडे पुढे म्हणाले की, संतोष देशमुख खून प्रकरणात कुणीही आरोपी असो, मग तो कुणीही असला तरी त्याला सोडू नये, अशी माझी भूमिका आहे. परंतु काहीजण राजकारण करीत आहेत. माझा राजीनामा घेण्यासाठी राजकारण केलं जात आहे. माझ्या समाजाला, मला टार्गेट केलं जातंय, असं करुन संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का?

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

”न्यायाचार्यांनी पंकजाताईंना या गडाची कन्या मानलेलं आहे. त्या गडाच्या कन्या आहेतच. मी या गडाचा निस्सीम भक्त आहे. या गडाच्या गादीचा मी निस्सीम भक्त आहे. जिथे आपली श्रद्धा असते, तिथे दर्शन घेतल्यानंतर ऊर्जा मिळते. त्यामुळे गड मागे उभा राहिल्याने माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आमच्या दोघांना मंत्रिपद मिळाल्याने (पंकजा मुंडे, धनंजय मुंडे) जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, अशी चर्चा आहेच. त्यावर मी जास्तकाही बोलणार नाही.” असं धनंजय मुंडे म्हणाले.