मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि खंडणी प्रकरणाबाबत मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली आहे. त्याला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली. विजय वड्डेटीवार यांनी वाल्मिक कराडचे एन्काऊंटर होऊ शकते, अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्याने आपणास दिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.






विजय वड्डेटीवार यांनी काय म्हटले?
माध्यमांशी बोलताना विजय वड्डेटीवार यांनी म्हटले की, पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात आहे. त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले. त्यावर पोलिसांसाठी बेड आणल्याचा खुलासा केला. पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाही. पोलीस आतापर्यंत कधी कॉटवर झोपले नाही. मग हे कोणाचे लाड करत आहे. पोलीस कोठडीत वाल्मिक कराड याला झोपवण्यासाठी ते कॉट आणले गेले काय, याची चौकशी झाली पाहिजे, असे वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.
एन्काऊंटर होण्याची भीती
विजय वड्डेटीवार यांनी पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊटर होऊ शकतो. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काऊंटर करु नका. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. आपण कराडचे एन्काऊटर करण्याची माहिती उच्चपदस्त अधिकाऱ्याने दिल्याचा दावा त्यांनी केला.
ट्विटच्या माध्यमातून आरोप
विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत महायुती सरकारवर आरोप केले आहे. त्यांनी म्हटले की, महायुतीच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मीक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल!
वाल्मीक कराड वर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी.
महायुती सरकारमध्ये गोंधळ सुरु असल्याचा आरोप विजय वड्डेटीवार यांनी केला. ते म्हणाले, पालकमंत्री नियुक्ती कधी होणार आहे. सहा महिन्यांपासून जिल्ह्याचे वाली कोणी राहिले नाही. मग २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी २६ जिल्ह्यांचे झेंडे फडकावावे. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन चार मंत्री अजूनही शपथ घेत नाही. पाशवी बहुमत मिळाल्यानंतर काय चालले, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होत नाही, घरावरुन वाद होत आहे. पालकमंत्री देत नाही.










