भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ‘पुणे लोकसभा’ हा जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न अन् हक्काचा मतदारसंघ या मतदारसंघातून सध्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे प्रतिनिधित्व करत असले तरी आगामी निवडणुका या वाढीव महिला आरक्षणाच्या होणार असल्याची चिन्हे लक्षात घेऊन राज्यसभा सदस्य डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी ‘सुपुत्राच्या रेशीमगाठी’च्या कार्यक्रमात संपूर्ण पुणे शहरातील प्रतिष्ठित नामांकित आणि सर्व स्तरातील पक्षीय कार्यकर्त्यांना व्यक्तिगत निमंत्रण देत आमंत्रित करण्याचा फंडा वापरून पुणेकर नातेसंबंधाचे धागे घट्ट विणले असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. एकीकडे पुणे शहरातील सर्व प्रशासकीय सर्वपक्षीय आणि माझी नगरसेवकांना (सर्व पक्षातील) व्यक्तिगत निमंत्रण देऊन पुणे शहरातील आपल्या स्नेहबंधाची चाचपणी केली तर दुसरीकडे पक्षातील सर्व वरिष्ठ आणि आद्यपूज्यनीय सर्व नेतृत्वांनाही व्यक्तिशः निमंत्रित करून त्यांचे आगमन घडून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे पुणे लोकसभेमध्ये मेधा कुलकर्णी यांच्या नावाचचे ‘वलय’निर्माण होण्यास मदत झाली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘पुणे लोकसभा’ (A++) स्तरावर मतदारसंघ म्हणून गणला जात आहे. या मतदारसंघावर दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षातून प्रचंड आणि प्रबळ दावेदारी असतानाच आपल्या स्नेहबंधाच्या जीवावरती पुणे लोकसभा मतदारसंघाची चाचणी या निमित्ताने राज्यसभा सदस्यांनी केली अशी चर्चा सध्या शहरांमध्ये सुरू झाली आहे. स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर दोन प्रबळ दावेदारांच्या स्पर्धेमध्ये विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारत विजय मिळवला असला तरी सुद्धा तत्कालीन इच्छुक माजी आमदार जगदीश मुळीक यांनाही महायुतीच्या गणितामुळे पक्ष आदेश मानावा लागला आहे. त्यांचाही आगामी काळात दावा प्रबळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सलग चौथ्यांदा आमदारकी विजय मिळवत राज्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या माधुरीताई मिसाळ यांचाही दावा नाकारता येत नाही. भारतीय जनता पक्ष कायम पक्ष बांधणी आणि जनसंपर्क याला प्राधान्य देत असल्यामुळे आगामी पुणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच दावेदारांना कायम सक्रिय राहणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच फक्त चार वर्षांवर राहिलेल्या आगामी पुणे लोकसभेसाठी हालचालींना वेग सुरू झाला आहे. आगामी काळात याची गती वाढेल आणि दावेदारही सक्रियपणे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम, मेळावे आखण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या पुणे शहरांमध्ये केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदय यांची स्वतंत्र कार्यकर्त्यांची फळी तयार होत असताना आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये याचे वेगळेच रंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची चुणूक (युवा मोर्चा कार्यकारिणी) ही सध्या मतदारसंघातील विभिन्न कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये जाणवत आहे. पुणे लोकसभेचा गड सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर नियुक्ती करून तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये एकही समुदायाचा उमेदवार न दिल्याने वाढत असलेली नाराजी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांची सक्रिय आणि उल्लेखनीय कामगिरी दिवसेंदिवस वाढत असताना ‘पुणे लोकसभा’ हा जिव्हाळ्याचा विषय होणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘कोथरूड’ हे भारतीय जनता पक्षाचे मुख्य केंद्र बनले आहे या मतदारसंघांमध्ये राज्यसभा केंद्रीय राज्यमंत्री महाराष्ट्र विधानसभेचे मंत्री अशी तिहेरी ताकद याच मतदारसंघात निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सध्या केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ (मूळ कार्यकर्ता व स्थानिक) यांच्यापेक्षाही विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षीय संघटनेच्या जीवावरती नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मिळवलेले यश बदलत्या गणितांचे संकेत देत आहेत. त्यातच राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनीही आपली पकड पुन्हा घट्ट करण्यास सुरुवात केल्यामुळे वरचढ कोण याची पुणे महापालिकेच्या निवडणुकीवेळी रंगीत तालीम होणार आहे. सध्या तरी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात आपली सक्रियता कायम ठेवली असली तरी सुद्धा 2026 मध्ये मतदारसंघाची होणारी पुनर्रचना आणि त्यानंतर पडणारी आरक्षणे या 50% आशेच्या जीवावर राज्यसभा सदस्य मेधाताई कुलकर्णी यांनी ‘लोकसभे’चा शुभारंभ? केला आहे का? ही चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळामध्ये तीन नेतृत्वांकडे सर्व वलय असल्यामुळे त्यांच्या हालचालींवर तीच पुणे लोकसभेची गणित अवलंबून राहणार आहेत.