नवीन वर्षांत सई ताम्हणकरची नवी सुरुवात; बनतेय पॅराग्लायडिंग पायलट

0

मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन चक्क पायलट बनली आहे. 2025 या नवीन वर्षाची सुरुवात सईने अत्यंत हटके पद्धतीने केली आहे. सई सध्या पॅराग्लायडिंगच प्रशिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे ती फक्त आवड म्हणून नाही तर पायलट होण्यासाठी सई याचं खास शिक्षण घेत आहे. अभिनयाच्या पलिकडे जाऊन एवढं कमालीचं क्षेत्र निवडण्याची ही प्रक्रिया कशी होती, हा विचार कुठून आला याबद्दल सई मोकळेपणे व्यक्त झाली.

“कामशेत टेंपल पायलट स्कूलमधून मी माझं पायलट कोर्सचं प्रशिक्षण घेतलंय आणि ही एक अशी शाळा आहे जिथे कौशल्यपूर्ण गोष्टी शिकवल्या जातात. भारतातील ही सगळ्यात बेस्ट स्कूल आहे. कारण तुमची सुरक्षा, तुमची शिकण्याची आवड या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला योग्य ते प्रशिक्षण दिलं जातं. मला अनेक वर्षांपासून असं वाटतं होतं की मी नवीन काही शिकले नाही. रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण एवढं गुंतत जातो आणि मग अनेक गोष्टी कुठेतरी शिकायच्या राहून जातात. आपण नवीन काहीतरी शिकू शकतो का? ते आपल्याला जमेल का? असे प्रश्न मनात निर्माण होतात. म्हणून गेले काही दिवस मी विचार करत होते आणि मग आव्हानात्मक स्पोर्ट्स (ॲडव्हेंचर स्पोर्ट्स) हे आपल्याला जमतं, म्हणून पायलट होण्याचा विचार मनात आला,” असं सईने सांगितलं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

याविषयी ती पुढे म्हणाली, “याआधी सुद्धा मी स्कायडायव्हिंग केलं आहे. तर मला असं वाटलं की पॅराग्लायडिंग शिकायला काय हरकत आहे? हा विचार मनात ठेवून मी हा कोर्स करायला गेले आणि पुन्हा एकदा एक माणूस म्हणून जगता आलं. असं म्हणतात प्रत्येक खेळ हा तुम्हाला खूप कमालीचा अनुभव देऊन जातो. तसंच या खेळामुळे मला अनेक सुंदर गोष्टी अनुभवता तर आल्याच, पण स्वतःबद्दल अनेक गोष्टीचा उलगडा या निमित्ताने झाला. स्वतःची क्षमता, मनस्तिथी काय आहे हे या स्पोर्ट्समुळे समजलं. जेव्हा तुम्ही एखादा खेळ शिकता तेव्हा या गोष्टी देखील तुम्ही आपसूक शिकत जाता. ज्या गोष्टीची तुमच्यात कमतरता आहे त्या गोष्टीवर तुम्ही आपोआप काम करता आणि हे काम तुमच्या खेळण्यातून होतं. पॅराग्लायडिंग पायलट व्हायचं होत असं अजिबात माझ्या डोक्यात नव्हतं. हा स्पोर्ट्स मला हटके वाटला आणि मी एखादी गोष्ट शिकायला घेते तेव्हा मला त्यात पुढे पुढे जायला आवडतं आणि ती गोष्ट अधिकाधिक आत्मसात करायला आवडते आणि म्हणून तितक्याच गांभीर्याने आवडीने मी ते शिकते.”

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा