भंडारा (Bhandara Crime) येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना परीक्षेत पास होण्यासाठी मार्क वाढवून देण्याचं आमिष दाखवत शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्याला पालकांनी जाब विचारत बेदम चोप दिला. हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयात घडला. किरण मुरकुट असं पालकांनी बदडलेल्या प्रभारी प्राचार्याचं नावं आहे.
मोबाईलवर लज्जास्पद मॅसेज पाठवून शरीरसुखाची केली मागणी
अधिकची माहिती अशी की, भंडारा येथे शासकीय नर्सिंग महाविद्यालय असून इथं 182 प्रशिक्षणार्थी ANM आणि JNM चं प्रशिक्षण घेतात. त्यातील काही विद्यार्थिनींना प्राचार्यांनी परीक्षेत पास करण्यासाठी गुण वाढवून देतो, अशी बतावणी करून काही मुलींना त्यांच्या मोबाईलवर लज्जास्पद मॅसेज पाठवून शरीरसुखाची मागणी केली. त्यातील काही पीडित मुलींनी सदर प्राचार्याची तक्रार त्यांच्या पालकांना केली आणि आज संतप्त पालक नर्सिंग महाविद्यालयात दाखल झालेत. यावेळी पालकांनी प्राचार्याला याबाबत विचारना केली असता त्यांनी उडवाउवीचं उत्तर दिलं आणि संतप्त पालकांचा संताप अनावर झाला आणि थेट त्यांनी प्राचार्याला चांगलाचं चोप दिला. यावेळी पोलिसांनी वेळीच दखल घेत प्राचार्याला ताब्यात घेतलं.
अहवाल तातडीनं राज्य सरकारकडं पाठविणार असल्याची माहिती
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दीपचंद सोयाम यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत नर्सिंग महाविद्यालयाला भेट दिली आणि प्राचार्याला पदावरून तात्काळ हटवत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरिता एका समितीची स्थापना केली आहे. प्राचार्याच्या कक्षाला सील ठोकले आहे. याचा अहवाल तातडीनं राज्य सरकारकडं पाठविणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सोयाम यांनी दिली आहे. दुपारी एक वाजताच्या सुमारास पीडित प्रशिक्षणार्थींना पोलिसांनी भंडारा पोलीस ठाण्यात बयानासाठी बोलावलं असून तब्बल चार तासांपासून त्यांचं बयान नोंदवून प्राचार्य विरोधात विनयभंग आणि इलेक्ट्रॉनिक (मोबाईल) माध्यमाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कलम 75, 78 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.