विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर आता भाजपा महापालिकेचा गड सर करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्या दृष्टिकोनातून भाजपकडून संघटनात्मक बदल स्थानिक पातळीवर करण्यात येत आहेत. भाजपने पुणे महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची तयारी सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजप स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.






गेल्या तब्बल तीन वर्षापासून रखडलेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लगेचच सर्व राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळाल्यामुळे कार्यकर्ते उत्साहात आहेत. याचाच फायदा घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. पुणे महापालिकेच्या सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये भाजपा कडून सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या प्रत्येक प्रभागांमध्ये दहा हजार सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. महापालिका निवडणूकीसाठी शहरातील 8 विधानसभा मतदार संघात निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. या निरीक्षकांच्या माध्यमातून शहरांमध्ये प्रभागवार बैठका देखील लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.
मागील महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला पुण्यात मोठे यश मिळालं होतं. भाजपचे तब्बल 100 नगरसेवक निवडून आले होते. तर त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 ते 35 नगरसेवक होते. काँग्रेस आणि शिवसेनेला त्यावेळी प्रत्येकी 10 नगरसेवकांवर समाधान मानावे लागले होते. मनसे दोन आणि एमआयएमला एक ठिकाणी विजय मिळवता आला होता.
पुणे महापालिकेत पाच वर्ष भाजपची स्वबळावर एखादी सत्ता होती. आगामी महापालिका निवडणुकीत देखील भाजपचा स्वबळावर ही सत्ता आणण्याचा प्रयत्न आहे. भाजपा कामाला लागली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महायुती एकसंघ राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.











