आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानमध्ये खेळण्यास टीम इंडियाचा सुरुवातीपासून नकार आहे. आम्ही टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवणार नाही, यावर बीसीसीआय ठाम आहे. त्यामुळे बीसीसीआय विरुद्ध यजमान पीसीबी यांच्यात वाद पाहायला मिळतोय. त्यामुळे अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. अशात क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
अंडर 19 आशिया कप स्पर्धेत 6 डिसेंबर रोजी उपांत्य फेरीतील दोन्ही सामने पार पडले. उपांत्य फेरीत टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका 4 संघ पात्र ठरले होते. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होण्याची शक्यता होती. टीम इंडियाने श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मात्र गतविजेत्या बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
इंडिया-बांगलादेश अंतिम सामना
दरम्यान रविवारी 8 डिसेंबरला अंडर 19 आशिया कप 2024 ट्रॉफीसाठी टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात महामुकाबला होणार आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत श्रीलंकेवर 7विकेट्सने विजय मिळवला. भारताने श्रीलंकेकडून विजयासाठी मिळालेलं 174 धावांचं आव्हान 21.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
बांगलादेशने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानचा 7 विकेट्स धुव्वा उडवला. बांगलादेशने पाकिस्तानला 116 धावांवर गुंडाळलं. बांगलादेशने त्यानंतर 22.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 120 धावा केल्या आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
टीम इंडिया : मोहम्मद अमान (कॅप्टन), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, किरण चोरमले (वीसी), प्रणव पंत, हरवंश सिंह पंगालिया (विकेटकीपर), अनुराग कावडे (विकेटकीपर), हार्दिक राज, मोहम्मद एनान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजीत गुहा, चेतन शर्मा आणि निखिल कुमार.
बांगलादेश टीम: अजीजुल हकीम तमीम (कॅप्टन), जवाद अबरार (उपकर्णधार) अल फहद, अशरफुज्जमां बारेनावा, देबाशीष सरकार देबा, फरीद हसन फैसल, इबल हसन एमोन, मारुफ मैधा, रफी उज्जमान रफी, रिफत बेग, रिजान होसन, साद इस्लाम रजिन, समियुन बसीर रतुल आणि शिहाब जेम्स.