…….ज्या घोषणेचा महायुतीच्या विजयात महत्वाचा वाटा राहिला. त्या घोषणेची अर्थात ‘एक है तो, सेफ है’ची झलकं आता मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडणार आहे. यासाठी १०,००० कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
सोहळ्यात नेमकं काय असेल?
महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात ‘एक है तो, सेफ है’ची झलक दिसणार आहे. त्यामुळं अर्थातच या शपथविधीला हिंदुत्ववाची झालर असणारेय. निवडणुकीतील प्रचारापाठोपाठ आता महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नाऱ्याची भाजपकडून पुनरावृत्ती होणार आहे. त्यानुसार, या सोहळ्यात दहा हजार कार्यकर्ते ‘एक हैं तो, सेफ हैं’ असा मजकूर असलेले ‘टी-शर्ट’ परिधान करणार आहेत. त्याचबरोबर या सोहळ्यात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येणार आहे.
भाजपशासित राज्यातील सर्वच मुख्यमंत्री लावणार हजेरी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी भाजपशासित १४ राज्यांतील मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर काही धार्मिक नेत्यांना देखील या सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. यावेळी लाडक्या बहिणींना देखील निमंत्रण पाठवण्यात आली आहेत. एकूणच तब्बल ४०,००० नागरिक या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
मुख्यमंत्रीपदाचा चेहऱा अजुनही गुलदस्त्यात
मुख्यमंत्र्याच्या शपथविधी सोहळ्याची एकीकडं जय्यत तयारी सुरु आहे, तर दुसरीकडं ज्याच्यासाठी एवढा घाट घालण्यात आला आहे, तो मुख्यमंत्री कोण असणार हेच अजून जाहीर झालेलं नाही. त्यामुळं जनतेतही नेमका हा शपथविधी सोहळा कोणासाठी होत आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
२३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीला निकाल लागला त्यात महायुतीनं बहुमत मिळवलं. पण ११ दिवस झाले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झालेला नाही, तसंच महायुतीनं राज्यपालांकडं बहुमताचा दावाही केलेला नाही आणि राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रणही दिलेलं नाही. त्यामुळं राज्यात नेमकं काय सुरु आहे? असा सवाल घटनातज्ज्ञही विचारत आहेत.